Loksabha 2019 : कमळाच्या प्रचारात भगव्याचे एक पाऊल पुढे..! 

yeola
yeola

येवला - मुळात भाजपाचा कधी बालेकिल्ला नसलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला नेहमीच भरभरून मते मिळाली आहे. यापूर्वी हा चमत्कार झाला तो उमेदवाराच्या नावावर.. यावेळी मात्र उमेदवार बदलल्याने चित्र वेगळे असले तरी येथील स्थानिक प्रचारात भाजपाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढे जात शिवसेनेच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. किंबहुना प्रचाराची मुख्य धुराच शिवसेनेचे आमदार किशोर दराडे तसेच माजी सभापती संभाजी पवार यांच्यावर सोपवली गेलिया आहे.विधानसभेची रंगीत तालीम समजून शिवसेना भाजपासोबत एकत्रितपणे प्रचारात सक्रिय झालेली दिसत आहे.

येवला शहर पारंपारिक जनसंघाचे गाव म्हणून परिचित असून भाजपाचा बालेकिल्लाही मानला जातो. सध्याचे नगराध्यक्ष भाजपाचे असल्याने हे म्हणणे सार्थकीही लागते. मात्र ग्रामीण भागाचा विचार केल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे प्राबल्य ग्रामीण भागात स्पष्टपणे दिसते. थेट लासलगाव मधील ४३ गावातही असेच चित्र असून उमेदवारांच्या संबंधावर येथील निवडणूक होत असते. यापूर्वी लोकसभेला युती असली तरी प्रचारामध्ये भाजप-सेनेचे म्हणावे असेच सख्य कधी जाणवले नाही. यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रथमच वेगळे चित्र दिसत असून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते एकोप्याने व जोमाने प्रचारात उतरले आहे. सत्ता आल्यापासून येथील भाजपाचे संघटन वाढले असले तरी अंतर्गत बंडाळीतून तीन-चार गट सक्रीय झाले आहेत. वरिष्ठांना याची जाणीव असल्याने व प्रचारातही याचे प्रतिबिंब दिसू लागल्याने पालकमंत्र्यांचे निकटवर्ती असलेले आमदार राहुल आहेर यांनी येथील प्रचाराची सूत्रे आमदार किशोर दराडे तसेच संभाजी पवार यांच्याकडे सोपविले आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाची टीम एकत्रितपणे जोमाने प्रचाराला लागलेली दिसत असल्याचेही सांगितले जाते.

आमदार नरेंद्र दराडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख असल्याने ते पूर्णवेळ तिकडे प्रचारात आहेत. मात्र येथे आमदार किशोर दराडे, माजी सभापती संभाजी पवार, उपसभापती रूपचंद भागवत, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष सुरज पटनी, भास्कर कोंढरे, धीरज परदेशी, छगन आहेर, झुंझार देशमुख आदींनी जोमाने व पूर्णवेळ प्रचाराची सूत्रे घेत दौरे सुरु केले आहे. भाजपामध्येही नगरसेवक प्रमोद सस्कर, नगराध्यक्ष बंडू शिरसागर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबा डमाळे, शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुका प्रमुख राजेंद्र परदेशी, ज्येष्ठ नेते श्रीकांत गायकवाड, मनोज दिवटे, दिनेश परदेशी, सुभाष पाटोळे, मीननाथ पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रचारात सक्रिय झाल्याने शहर व तालुक्यात पवारांना बळ देण्यात हे नेते मंडळी यशस्वी झाल्याचे दिसतेय.

मताधिक्यासाठी शिवसेनेने उचलला विडा 
तालुका तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कोणताही उमेदवार असेल तरी 35 ते 40 हजार हक्काची मते या पक्षाची असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. आता युती झाल्याचे पक्ष नेत्यांनी जाहीर केल्याने सहाजिकच विधानसभेच्या दृष्टीनेही शिवसेनेच्या आशा वाढल्या आहेत. आज आपण सक्रिय राहिलो तर उद्या भाजपही सक्रिय व प्रामाणिक राहील असे गणित तर कुणीही पुढे धरेल पण मतदारसंघातून आज भाजप उमेदवार पवारांना जास्त मताधिक्य मिळाले तर ही विधानसभेसाठी व आपल्यासाठी बेरजेची बाजू ठरणार असल्याने शिवसेनेचे इच्छुक असलेले उमेदवार संभाजी पवार तसेच रूपचंद भागवत हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहे. दराडे-पवार जोडीचे नियोजनाने प्रचाराला दिशा दिल्याचे दिसते. आमदार दराडे तर बंधूंना थेट मातोश्रीवरून बोलावणे आले होते. त्यावेळी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विजयासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिल्याने दराडे बंधूही सक्रिय झालेले असल्याचे सांगण्यात येते. एकूणच या सगळ्या गणितांचा फायदा येवला- लासलगाव मतदारसंघात भाजपला किती होतो आणि विधानसभेची रंगीत तालीम म्हणून शिवसेनेला मताधिक्य मिळवून देत या तालमीत बाजी मारण्यात कितपत यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com