शहर स्वच्छतेसाठी सोशल मीडियाची मदत 

socialmedia
socialmedia

मालेगाव - शहरात अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर होते. तत्कालीन आयुक्त लतीश देशमुख यांनी त्यावर लक्ष केंद्रित करीत दैनंदिन स्वच्छतेला प्राधान्य दिले. अधिकारी व कर्मचारी यांना शिस्त लावली. त्यांचा कित्ता गिरवत आयुक्त रवींद्र जगताप यांनी स्वच्छतेच्या समस्या, प्राथमिक अडचणी व तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी त्यांना सोशल मीडियाची मदत झाली. 

महापालिका ग्रुपवर कचऱ्याचा ढिगारा, सांडपाणी वा गटार बंद झाली यासह कुठल्याही तक्रारीचे छायाचित्र झळकले, की आयुक्तांनी त्यात लक्ष घालून ती समस्या तातडीने मार्गी लावणे हा शिरस्ता झाला. त्याचे चांगले परिणाम शहरात दिसत आहेत. यामुळे सर्व काही नकारात्मक नाही. पूर्व भागाची स्थिती विदारक असली तरी पश्‍चिम भागात अनेक वॉर्ड चकाचक आहेत. प्रामुख्याने कॅम्प व संगमेश्‍वर परिसरातील काही भाग यात आघाडीवर आहेत. सोयगाव नववसाहत भागातील तिलकेश्‍वर महादेव मंदिर परिसर तर लोकसहभागातून देखणा झाला आहे. यामुळे दोन भिन्न टोकांची स्थिती आहे. यातूनच शहर स्वच्छतेबाबत "असेही अन्‌ तसेही' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. "शहर की गंधगी की बातें दिन रात होती रहती है, ये अलग बात है सफाई की शुरवात नहीं करता कोई।' 

शहराची भौगोलिक स्थिती सर्वोत्तम आहे. मध्यवर्ती भागातून मोसम नदी वाहते, तर गिरणा नदी गावाला वळसा घालून बाहेरून जाते. पूर्वेला दरेगाव टेकडी भागात डोंगरांची रांग आहे. शहरात प्रवेश करताच गिरणा पुलाजवळील विस्तीर्ण कोल्हापूर बंधाऱ्याचा जलाशय लक्षवेधी आहे. पश्‍चिमेस गिरणा काठावर पाण्यामुळे दुतर्फा हिरवे रान बहरले आहे. खोलगट बशीच्या आकारात वसलेल्या या शहराचे मोसम नदीमुळे विभाजन झाले आहे. पूर्व मुस्लिमबहुल भाग व पश्‍चिम हिंदू लोकवस्तीचा भाग अशी विभागणी आहे. पूर्व भागात सर्वांत दाट लोकवस्ती असल्याने तेथील स्वच्छतेची स्थिती बिकट आहे. महास्वच्छता अभियान राबविताना या भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाला व स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना त्याची जाण आहे. या भागात नव्याने आलेले अधिकारी स्वच्छतेसाठी पाठविणे म्हणजे त्यांची अग्निपरीक्षा घेण्यासारखे आहे. त्यामुळे हा सर्व भाग महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून एकाच वेळी सर्व ताफा पाठवून सफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. यामुळे महास्वच्छता अभियान यशस्वी होण्यातील पहिला अडथळा दूर झाला आहे. 
शहरातील पश्‍चिम भागात स्वच्छतेबाबत सकारात्मक स्थिती आहे. पूर्व भागात काहीशी उदासीनता असल्याने या भागात व्यापक जनजागृतीची गरज आहे. यासाठी ऊर्दू भाषेतील पत्रके घरोघरी पोचविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. हे प्रयत्न सफल झाल्यास शहराची लोकसंख्या सुमारे सात लाखांहून अधिक आहे. यामुळे प्रत्येक घरातील किमान दोन व्यक्ती मोहिमेत सहभागी झाल्या तरी एक लाख लोक या अभियानासाठी रस्त्यावर येतील. असे झाल्यास स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा कायापालट होईल. स्वच्छतेत सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक साधनसामग्रीचे नियोजन करणे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. 

गुडमॉर्निंग पथक जोमाने कार्यरत 
शहरात उघड्यावर शौचासाठी मुख्य चौक, नदीपात्रासह 62 ठिकाणांचा वापर होतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रभागनिहाय गुडमॉर्निंग पथक नियुक्त करण्यात आले आहे. कालपासून या पथकांनी जोमाने काम सुरू केले आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना प्रथम समज देण्यात येते. त्यानंतर वैयक्तिक शौचालयाबाबत माहिती पथकातील कर्मचारी देतात. या उपाययोजनांनंतरही या प्रकारांना पायबंद न बसल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले. 

नगरपित्याकडूनच फिरत्या शौचालयाची विक्री 
केंद्र, राज्य शासन, महापालिका व महसूल प्रशासन स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. स्वच्छतेचा अजेंडा केंद्रस्थानी असतानादेखील शहरातील एखाद्या नगरसेवकाला त्याचेदेखील सोयरसुतक नसते. त्याचे एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. येथील कॅम्प, शिवाजीवाडी भागात नदीकिनारी महापालिकेने ठेवलेले दहा युनिटच्या फिरत्या (मोबाईल) शौचालयाचा लोखंडी सांगाडा चोरून विकण्यापर्यंत या नगरपित्याची मजल गेली. शौचालयाच्या सांगाड्यावरील प्लास्टिक युनिटची तोडफोड करून ट्रॉलीरूपी सांगाडा थेट एका वर्कशॉप मालकाला विक्री करण्यात आला. या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच संबंधित नगरसेवकाने सांगाडा रातोरात याच भागातील स्मशानभूमी परिसरात आणून ठेवला. यानंतर अनोळखी व्यक्तीने सांगाडा नेल्याचा बनाव केला. याबाबत रामलिंग त्रिमुखे यांनी येथील नगरसेवक मनोज पवार यांचे थेट नाव घेत शौचालय व सांगाडा चोरीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कॅम्प पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन सादर केले आहे. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com