बाहेरगावी गेले तरी घरावर नजर ठेवण्याची शक्‍कल... 

कमलेश पटेल
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पोलिसांवर विसंबून राहायचे; म्हणून आपली सुरक्षा आपणच करूया या विचारातून शहरातील ब्रह्म सृष्टी कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत घर व परिसरावर सामूहिकपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले. अर्थात आता पोलिसांचा नव्हे..तर नागरीकांचाच तिसरा डोळा आहे. 

शहादा : दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सोनसाखळी चोरी, मोटरसायकल चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे शहादा शहरात घडत आहेत. हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे पडतेय आणि प्रशासन हतबल होवून बसले आहे. म्हणून आता किती दिवस पोलिसांवर विसंबून राहायचे; म्हणून आपली सुरक्षा आपणच करूया या विचारातून शहरातील ब्रह्म सृष्टी कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत घर व परिसरावर सामूहिकपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले. अर्थात आता पोलिसांचा नव्हे..तर नागरीकांचाच तिसरा डोळा आहे. 

शहादा शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर 52 बंगल्याची ब्रह्मसृष्टी कॉलनी आहे. या कॉलनीत सगळ्यांचेच टुमदार घरे. लग्नप्रसंग किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे घराला कुलूप लावून बाहेर गावी जाण्याच्या प्रसंग नेहमी येत असतो. परिणामी चोरीच्या घटना घडतात. घटना घडल्यावर फिर्याद, तपास आदी सोपस्कार सुरूच असतो. तसेच इतरही ठिकाणी महिलांवरील अत्याचार चोरीच्या घटना होत असतात. हे सगळे वाचून येथील रहिवासी निवृत्त अभियंता जितेंद्र पाटील यांच्या कल्पनेतून सुचली; आपल्या कॉलनी पुरती का असेना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. 

अधिक वाचा > आम्ही पुन्हा- पुन्हा येऊ... 

यथाशक्‍तीप्रमाणे सहकार्य 
कॉलनीतील रहिवासी कामानिमित्त इतरत्र असतात. त्यामुळे तिसऱ्या डोळ्याची नजर सर्व घडामोडींवर राहते. काही घटना घडल्यास कॅमेरातील फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना तपासासाठी सहकार्य होते. त्यामुळे त्यांनी कॉलनीतील सगळ्या सहकाऱ्यांना बोलवून छोटेखानी मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्या रहिवाशांनी दुजोरा दिला. त्यात यथा शक्तीप्रमाणे सहकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. कोणालाही सक्ती नाही. उर्वरित खर्च स्वतः श्री पाटील यांनी केला. 

हेही वाचा > गिरीश महाजनांच्या जामनेरात चिरीमिरीचे ग्रहण 

52 बंगले..16 कॅमेरे... 
दरम्यान कॉलनीत 52 बंगले असून या बंगल्याभोवती ठिकठिकाणी कॉलनीतील सगळे घरे दिसतील; अशा पद्धतीने 16 कॅमेरे बसविण्यात आले. सगळ्या कॉलनीतील संपूर्ण चित्रीकरण एका बंगल्यात टीव्हीवर दिसते. त्याचबरोबर घरातील प्रमुख माणसाच्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण घडामोडींचे चित्रीकरण दिसणार आहे. त्यामुळे कुठेही कोणत्याही क्षणी मोबाईल उघडून सदर व्यक्ती आपले घर सुरक्षित आहेत का? हे पाहू शकतो. हे सर्व करण्यासाठी सुमारे 1 लाख 43 हजार रुपयांच्या खर्च आला असून बसवल्यानंतर त्याला लागणारा मेंटेनन्सचा खर्च संपूर्ण कॉलनी करणार आहे. 

हा उपक्रम मोठमोठ्या शहरांमध्ये राबवला जातो. दिवसेंदिवस अनेक घटना घडत आहेत. त्या आपण ऐकतोय. शहरातही नवीन वसाहती होत असतील त्याठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतल्यात भविष्यात होणाऱ्या घटना टाळता येतील. चोरांवर वचक बसेल यासाठी नागरिकांनी जागृत होऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत." 

- जितेंद्र पाटील, ब्रम्हसृष्टी कॉलनी शहादा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: society people cctv camera shahada news