Latest Marathi News | अध्यात्म अन्‌ पर्यटनाचा अनोखा संगम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Songir News

Dhule News : अध्यात्म अन्‌ पर्यटनाचा अनोखा संगम

सोनगीर: वैविध्यतेने नटलेल्या सोनगीर (ता. धुळे)मध्ये अध्यात्म आणि पर्यटनाचा संगम घडलेला दिसतो.

यात आनंदवन संस्थान, निरनिराळ्या सुमारे ६० मंदिरांमुळे अध्यात्म, धार्मिकतेचे अधिष्ठान या गावाला लाभले असून, ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ला, सोनवद धरण, चैतन्यवन पर्यटकांना आकर्षित करीत असते. त्यामुळे कायम रेलचेल, त्यातून रोजगाराची जोड अर्थकारणाला लाभत असते.

धुळे शहरापासून मुंबई-आग्रा महामार्गावर सरासरी २० किलोमीटरवर २५ हजार लोकवस्तीचे सोनगीर आहे. येथे ३७ वेगवेगळ्या जाती-धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदतात. यात सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळ आहे. (Songir unique combination of spirituality and tourism tourists along with devotees all over country to Songir Dhule News)

हेही वाचा: Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

गावात श्री महादेव, श्रीराम, मारुती, शनिदेव, बालाजी, श्रीकृष्ण, गणपती, विठ्ठल- रखुमाई, दुर्गादेवी, कालिकादेवी, जगदंबादेवी, संतोषीमाता, मरीआई, महालक्ष्मी, जागमाता, सिद्धमाता, सप्तशृंगीदेवी, साईबाबा आदींसह स्वातंत्र्य संग्राम लढ्यात योगदान असलेले गुरुगोविंद महाराज तसेच त्यांच्या शिष्यपरंपरेतील केशवदत्त महाराज, मधुसूदन महाराज व नुकतेच जीर्णोद्धार झालेले प्रणामी मंदिर, तपोभूमी धाम आदी सुमारे ६० मंदिरे आहेत. आनंदवन संस्थानची कीर्ती सर्वत्र पसरली आहे.

भाविकांचा कायम ओघ

श्री सोमेश्वर मंदिरात वर्षभर मुहूर्त न पाहाता विवाह होतात. त्यामुळे नेहमीच गर्दी असते. कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरते. समोरच श्री दत्तप्रभूंचे मंदिर असून, दत्तजयंतीनिमित्त यात्रा भरते. आश्विन एकादशीला रथयात्रा व ज्येष्ठमध्ये गुरुगोविंद महाराजांची पालखी निघते. त्या वेळी राज्यासह परराज्यातील भाविक येतात. त्यासाठी भक्त निवास आहे.

श्री प्रणामी मंदिरामुळे सोनगीरचे नाव देशभरात पसरले. मंदिरात निवासासह जेवणाची चांगली सोय आहे. प्रणामी मंदिरात दर्शनासाठी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड येथील भाविक येतात. गावात जैनधर्मीयांचे प्राचीन तीर्थस्थळ भगवान पुष्पदंत मंदिर आहे. कोट्यवधींच्या खर्चातून या मंदिराचे नव्याने भव्य बांधकाम सुरू आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

पर्यटनाला चांगला वाव

पर्यटनमंत्री असताना आमदार जयकुमार रावल यांनी गावासह जिल्ह्याचे वैभव ठरलेल्या ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ल्यासाठी निधी दिला. त्यातून पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक रेलिंग, प्लास्टर, पिण्याचे पाणी, रस्ता, किल्ला व पायऱ्यांवर संरक्षक भिंत व कठडे, काँक्रिट बेंचेस आदी कामे झाली.

ग्रामपंचायतीने किल्ल्यावर वीजखांब, दिवे लावल्याने रात्री झगमगाट पाहण्यासारखा असतो. आठशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यात सासू-सुनेची विहीर, तोफखाना, दही जमविण्याचे पात्र आदींचे अवशेष आहेत.

किल्ल्याजवळच श्री गुरुगोविंद महाराज मंदिर, लगत पाझर तलाव, दक्षिणेस निसर्गरम्यस्थळी श्री सोमेश्वर मंदिर, दोन किलोमीटरवर जामफळ धरण, स्काउट हब, मारुती मंदिर, पाच किलोमीटरवर सोनवद धरण व लगत टेकडीवर भवानी मंदिर, तीन किलोमीटरवर चैतन्यवन आदी पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांचा ओघ सुरूच असतो. शिवाय विद्यार्थ्यांच्या सहली येतात.

खरेदीसह खवय्यांचा आनंद

भेटीनंतर सोनगीरची बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असते. तांब्या-पितळेची भांडी खरेदीसाठी सोनगीर देशात प्रसिद्ध आहे. कापड, मंदिरातील देवदेवतांचे मुखवटे, कळस, लाकडी बैलगाडी, मूर्ती आदी बाजारपेठेत उपलब्ध असतात. सोनगीरच्या प्रसिद्ध ढाब्यांवरील खास शेवची भाजी व इतर स्वादिष्ट जेवण पर्यटकांना आनंद देते.

हेही वाचा: Nashik News : प्रदीर्घ काळानंतर ‘निमा’ चा कारभार सुरू होणार