
Dhule News : निर्बीजीकरण कामाच्या मुहूर्ताला पुन्हा ब्रेक; अडथळ्यांच्या मालिकेमुळे कुत्रे ‘मोकाट’च!
धुळे : शहरातील भटके व मोकाट कुत्र्यांच्या (Dog) निर्बीजीकरणाला मुहूर्त मिळालेला असतानाच या कामात पुन्हा नवीन अडथळा उभा राहिला आहे.
एका प्राणिरक्षक संस्थेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम दिलेल्या संस्थेवरच आक्षेप घेतला आहे. (sterilization of stray dogs has stopped due to animal protection organizations objection dhule news)
त्यामुळे या कामाला सुरवात होण्यापूर्वीच ब्रेक लागला आहे. दरम्यान, या संदर्भात चर्चेसाठी १६ फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतून काय निर्णय पुढे येतो यावर कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कामाचे भवितव्य ठरणार आहे.
धुळे शहरातील भटक्या, मोकाट कुत्र्यांच्या दहशतीची मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येने धुळेकर हैराण झाले आहेत. नागरिकांसह नगरसेवक, विविध पक्ष-संघटनांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी झाली, या विषयावर आंदोलने झाली.
अधिकाऱ्यांना इशारे देण्यात आले. अखेर निर्बीजीकरणातून मोकाट, भटक्या कुत्र्यांच्या समस्येला लगाम घालण्याचा पर्याय पुढे आला. यासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. यात पहिला निविदाधारक फेल झाल्यानंतर दुसऱ्या निविदाधारकाला बोलावणे झाले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
यातही अनेक अडथळे आल्यानंतर अखेर जयपूर येथील संतुलन जीवकल्याण या संस्थेला प्रतिश्वान ८७५ रुपये या दराने हे काम देण्यात आले. या संस्थेला वर्कऑर्डर दिल्यानंतर नवीन वर्षात काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी जागांचा शोध, सेटअप, यंत्रणा उभारणे आदी विविध कामे अद्यापपर्यंत सुरू होती.
त्यामुळे नवीन वर्षाचा दीड महिनाही लोटला. डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा सेटअप संबंधित संस्थेने उभारला. मनपा प्रशासनाने महापालिका हद्दीतील मोकाट कुत्रे निर्बीजीकरण व शस्त्रक्रिया करण्यासाठी देखरेख समितीची स्थापनाही केली. नवनिर्वाचित महापौर प्रतिभा चौधरी यांच्या उपस्थितीत हे काम सुरू करण्याची प्रशासनाची तयारीही झाली. दरम्यान, यात पुन्हा नवा अडथळा उभा राहिला आहे.
संस्थेच्या कामावर आक्षेप
आधार प्राणिरक्षक व सामाजिक संस्थेने कुत्रे निर्बीजीकरणाचे काम दिलेल्या संतुलन जीवकल्याण या संस्थेच्या कामाबद्दल आक्षेप घेत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. संबंधित संतुलन जीवकल्याण संस्थेने विविध राज्यात कुत्रे निर्बीजीकरणाचे काम केले असून, हे काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा संस्थेचा आरोप आहे.
तक्रार करणाऱ्या या संस्थेचा महापालिकेने नेमलेल्या देखरेख समितीतही समावेश आहे. त्यामुळे हा गुंता सोडविण्यासाठी पुन्हा या कामाला ब्रेक लागला आहे. दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी १६ फेब्रुवारीला मनपा अधिकारी, प्राणिरक्षक संस्था व संतुलन जीवकल्याण संस्था यांच्या प्रतिनिधींची महापालिकेत बैठक बोलण्यात आली आहे.
देखरेख समिती अशी
महापालिका हद्दीतील मोकाट कुत्रे निर्बीजीकरण व शस्त्रक्रिया करणेकामी देखरेख समिती अशी ः अध्यक्ष- मनपा उपायुक्त विजय सनेर, सदस्य- वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, आरोग्य कार्यालयप्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विशाल पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. भूषण वाकडे, आधार प्राणिरक्षक व सामाजिक संस्था प्रतिनिधी.