
ट्राला अंगावरून गेल्याने परीक्षेला जाणारी विद्यार्थिनी जागीच ठार
नवापूर : परीक्षेला जात असलेल्या विद्यार्थिनीला ट्रालाने उडवले. या अपघातात विद्यार्थिनी ठार झाली, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास नवी सावरट गावाजवळील महामार्गावर घडली.
नवी सावरट (ता. नवापूर) गावाजवळ ट्रालाने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीस्वार महामार्गावर फेकला गेला, ती विद्यार्थिनीच्या अंगावरून ट्राला गेल्याने ती जागीच ठार झाली आहे. तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरती सुमन गावित (वय २१, रा, वडखुट), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर क्रिष्णा जोल्या गावित (२३, रा. पाटीबेडकी) गंभीर जखमी झाला आहे. ट्रालाचालक घटनास्थळावरून फरारी झाला आहे. अपघात होताच आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीला धावून आले. १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून डॉ. हेमंत पवार, पायलट विनोद देसाई यांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन कक्षाबाहेर आई व नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला.
हेही वाचा: लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन पळालेल्या वधूसह चौघे अटकेत
मृत आरती गावित येथील आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचा गुरुवारी (ता. १९) शेवटचा पेपर होता. ती पेपर देण्यासाठी निघाली. मात्र, वाटेतच तिच्यावर काळाने घाला घातला. घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने वडखुट गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा: तो वेडा आहे सांगणाऱ्या पोलिसांनाच बनवले ‘मामू’; कैद्याने काढला पळ
Web Title: Student Killed In Truck Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..