उन्हाळ्यात शीतपेयांचे आजाराला आमंत्रण

राजेश सोनवणे
शनिवार, 25 मे 2019

बर्फाच्या मागणीवर परिणाम
हल्ली लग्नसमारंभात थंड पाण्यासाठी बर्फाऐवजी पाण्याचे जार वापरले जात आहेत. यामुळे बर्फाच्या मागणीवर ३० टक्‍के परिणाम झाला असून, आता केवळ शीतपेयांच्या गाड्या, आइस्क्रीम, कुल्फी तयार करण्यासाठी बर्फ वापरला जात आहे. जळगावात बर्फ निर्मितीचे पाच कारखाने असून, एका कारखान्यात दिवसाला १५ टन बर्फ तयार केला जातो.

जळगाव - उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कडक उन्हात फिरताना शीतपेये, सरबत किंवा हातगाडीवर बर्फावर ठेवलेले खाद्यपदार्थ सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. पण कडक उन्हात काही क्षण गारवा देणारे हे उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ व शीतपेयांमधील कार्बन आजारपणाला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे समोर आले आहे.

उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र उन्हाच्या झळा अनेकदा शरीराला असह्य होत असतात. यातून प्रामुख्याने उष्माघात, उन्हाळी लागणे, थकवा येणे, चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ यांसारखे विकार जाणवत असतात. उन्हात फिरताना मनाला थंडावा मिळण्यासाठी शीतपेयांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण काही वेळापुरता गारवा देणारे गाड्यांवरील हे शीतपेय शरीराला अपायकारक ठरू शकतात. 

अपायकारक रंगांचा वापर
शीतपेयांमध्ये कार्बनयुक्त (सोडा) पेयांची मागणी अधिक होते. शीतपेयांमध्ये प्रदूषित अखाद्य बर्फाचा वापर होत असतो. अशा पेयांमुळे घशाला संसर्ग होऊन घशाचे विकार, कार्बनयुक्त पेयांमुळे पचनसंस्थेवरदेखील परिणाम होतो. शिवाय वेगवेगळ्या चवींच्या सरबतासाठी वापरण्यात येणारे रंगदेखील शरीरासाठी घातक आहेत. यामुळे पोटदुखी, उलटी, खाज येण्याची शक्‍यता असते. यामुळे कार्बनयुक्त किंवा रंगांचा वापर असलेल्या पेयांपेक्षा लिंबू, कोकम, वाळा अशी सरबते पिणे चांगले आहे.

हातगाड्यांवर विकल्या जाणाऱ्या सरबतांमध्ये वापरला जाणारा बर्फ आणि रंग हे शरीरास अपायकारक ठरत असतात. गाड्यांवरील अशा सरबतांपेक्षा लिंबू सरबत, कोकम किंवा घरी बनविलेले सरबत आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
- डॉ. रवींद्र भंगाळे (एम. डी.), जळगाव

बर्फाचा वापर आता शीतपेयांच्या गाड्या, आइस्क्रीम बनविण्यापुरता मर्यादित राहिला आहे. लग्नसोहळ्यासाठी होणारी मागणी आता बंद झाली आहे. कारखान्यात चांगल्या प्रतीचा बर्फ बनविला जातो.
- आशिष बिर्ला, संचालक, बिर्ला आइस, जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Cold Drinks Sickness Ice Water Jar