उष्णतेसोबत उकाडाही वाढला !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

जळगावातील कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून ४३ अंशांवर स्थिरावले असून, उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यात आग ओकणाऱ्या उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलाने आर्द्रतेत प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

जळगाव - जळगावातील कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून ४३ अंशांवर स्थिरावले असून, उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यात आग ओकणाऱ्या उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलाने आर्द्रतेत प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 

गेल्या दीड महिन्यापासून उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. तापमान काही अंशाने खाली येऊन पारा पुन्हा वर चढला आहे. जळगाव शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून आठवड्यापासून पारा ४३ अंशावर स्थिरावलेला आहे. यामुळे उन्हाची तीव्रता अद्याप कमी झालेली नाही.

यातच वाढलेला उकाडा आणि उष्णतेच्या झळांमुळे जळगावकर प्रचंड हैराण आहेत. या आठवड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, उकाड्यात वाढ झाली. आज कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ६९ टक्‍के होती.

उकाड्याने घामाच्या धारा
तापमानवाढीसोबतच आर्द्रता वाढल्याने उकाडा देखील वाढला आहे. तापमानाच्या झळा असह्य होत असताना वाढलेल्या आर्द्रतेने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढ असून उकाडा असह्य होत आहे. बाहेर असह्य उष्णतेच्या झळा आणि घरात घामाच्या धारा अशी स्थिती जळगावकरांची सध्या झाली आहे. काम करताना किंवा नुसते बसलेले असताना देखील अंगातून घामाच्या धारा निघत आहेत.

पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा
यंदाचा मॉन्सून लांबल्याने जिल्ह्यात किमान दहा- बारा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तापमानाची तीव्रता कमी झाली नसून यात उकाड्यात झालेल्या वाढीमुळे मॉन्सूनचे आगमन कधी होणार? याची प्रतीक्षा लागून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Heat Temperature Increase