तापमानाबरोबरच उकाड्यातही प्रचंड वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

उकाड्यातही वाढ
जळगावातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याने आर्द्रतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. आर्द्रता वाढल्याने उकाडा देखील वाढला आहे. उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या असून, आज कमाल तापमान ४२, किमान तापमान २७ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ६९ टक्‍के इतकी होती. आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला असून, अंगावरून घामाच्या धारा लागत होत्या. असे वातावरण आणखी आठवडाभर राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

जळगाव - तापमानाचा वाढलेला उच्चांक आणि उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना चांगलेच हैराण केले आहे. आठवडाभरापूर्वी खाली आलेले शहरातील तापमान पुन्हा ४२ अंशांवर पोहोचले आहे. तापमानासोबत आर्द्रता वाढल्याने आता उकाड्यातदेखील वाढ झाली आहे. 

एप्रिलच्या मध्यंतरापासून सलगपणे तापमानात प्रचंड वाढ होत राहिली. यामुळे शहरातील पारा ४६ अंशांपर्यंत पोहोचला होता. अशा परिस्थितीत अंगाची लाही-लाही करणाऱ्या असह्य होणाऱ्या उष्णतेच्या झळांनी जळगावकर हैराण झाले होते. यामुळे दुपारी रस्त्यांवर अगदी अघोषित संचारबंदी अनुभवण्यास मिळत होती; परंतु गेल्या आठवड्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे पारा खाली घसरल्याने तापमान ३९ अंशांपर्यंत खाली गेले होते. परिणामी, उष्णतेच्या झळांपासून जळगावकरांची काहीशी सुटका झाली होती. मात्र जळगावचा पारा पुन्हा वर चढून ४२ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. 

पारा स्थिरावला
सलग दोन- तीन आठवडे तापमान ४५ अंशांवर राहिल्यानंतर वातावरणात थोडा बदल झाला. काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमान ३९ अंशांवर खाली आले होते. यामुळे दुपारी जाणवणाऱ्या उष्णतेच्या झळादेखील बंद होऊन हवेत देखील थोडा गार वारा जाणवत होता. मात्र, आठवडाभरानंतर चार- पाच दिवसांपासून उष्णतेत पुन्हा वाढ होऊन पारा ४२ अंशापर्यंत पोहचला आहे.

जळगावातील तापमान तीन दिवसांपासून ४२ अंशावर स्थिरावलेला आहे. परिणामी दोन दिवसांपासून दुपारी उष्णतेच्या तीव्र झळादेखील जाणवू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Temperature Increase