Sunny Salve Case : तपास अधिकारी हिरेंची दोन तास सरतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Sunny Salve Case : तपास अधिकारी हिरेंची दोन तास सरतपासणी

धुळे : शहरातील देवपूर भागात सशस्त्र हल्ल्यात खून झालेल्या सनी साळवे (Sunny Salve) खून प्रकरणी शुक्रवारी (ता. ३) तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी सचिन हिरे (Sachin Hire) यांची महत्त्वपूर्ण साक्ष सुरू झाली. (sunny salve murder case Investigating Officer Sachin Hires re examination for 2 hours in court dhule crime news)

साधारण दोन तास त्यांची सरतपासणी झाली. या साक्षीदरम्यान तपास अधिकारी हिरे यांनी फिर्याद दाखल झाल्यापासून तर घटनास्थळ पंचनामा होईपर्यंत घटनाक्रम मांडला. फिर्यादी साक्षीदार सागर साळवे यांचा जबाबही दाखविण्यात आला, श्री. हिरे यांनी तो ओळखला. दरम्यान, साक्ष ऐकण्यासाठी न्यायालयात व न्यायालय कक्षाबाहेर मोठी गर्दी झाली होती.

सनी साळवे खून खटल्याचे कामकाज न्या. एम. जी. चव्हाण यांच्यासमोर सुरू आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी हिरे यांची शुक्रवारी साक्ष सुरू झाली. तपास अधिकारी स्वतः फिर्यादी, पंच व फॉरेन्सिक टीम यांच्यासह घटनास्थळी गेले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

घटनास्थळ फिर्यादीने दाखविले. नरसिंह बिअरबारजवळील घटनास्थळी जाऊन मातीमिश्रित रक्ताचे नमुने घेतले, बेस बॉल बॅटचे तीन तुकडे जप्त केले, मृत व जखमी साक्षीदारांच्या चपला जप्त केल्या, रक्ताचे डाग, तोडफोड झालेल्या मृत व साक्षीदारांच्या गाड्या जप्त केल्या. तसेच सिद्धेश्वर हॉस्पिटल परिसरात पुन्हा आरोपींनी साक्षीदारांना मारहाण केली व सौरभ यासदेखील मारहाण केली.

सौरभचे रक्त ज्या गाडीच्या नंबर प्लेटवर पडले होते ती रक्ताने भरलेली नंबरप्लेट ओळखली, तसेच जखमीचे चप्पल आदींचा पंचनामा करून ताब्यात घेतले आदी घटनाक्रम मांडण्यात आला. घटनास्थळी जप्त केलेले साहित्य तपास अधिकारी हिरे यांनी ओळखले. जवळपास दोन तास त्यांची सरतपासणी झाली.

चंदननगर येथील सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ ला खून झाला होता. या खून खटल्यातील काही आरोपी तुरुंगात आहेत. या खून खटल्यात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष झाली असून, लवकरच निकालाची शक्यता आहे. या खून खटल्यात विशेष सरकारी वकील श्यामकांत पाटील काम पाहत असून, ॲड. विशाल साळवे त्यांना सहकार्य करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.