न्याहळोदच्या स्वप्नीलने फडकवला झेंडा...यूपीएससीमध्ये यश... 

अश्‍पाक खाटीक
Wednesday, 5 August 2020

न्याहळोद येथील रहिवासी आणि सध्या धुळे शहरात वास्तव्यास असलेले नगाव एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त विज्ञान शिक्षक वसंत पाटील यांचा तो मुलगा आहे.

न्याहळोद (धुळे) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत न्याहळोदच्या (ता. धुळे) तरुणाने यशाचा झेंडा रोवला. स्वप्नील पवार-पाटील याने यूपीएससी परीक्षेत ४४८ वी रँक मिळवत जिल्ह्यातून एकमेव उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. 

न्याहळोद येथील रहिवासी आणि सध्या धुळे शहरात वास्तव्यास असलेले नगाव एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त विज्ञान शिक्षक वसंत पाटील यांचा तो मुलगा आहे. स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण देवपूरमधील श्री एकवीरादेवी हायस्कूलमध्ये झाले. दहावीला तो देवपूरमधील महाजन हायस्कूलमध्ये होता. नंतर जयहिंद महाविद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. पुढे स्वप्नीलने अंधेरी (मुंबई) येथील एस.पी.महाविद्यालयात बी.टेक.ला प्रवेश घेतला. सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने नंतर दिल्ली गाठत या परीक्षेचा अभ्यास केला. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याची जाणीव ठेवत स्वप्नीलने अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळेच आतापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेत त्याने नेत्रदीपक यश मिळविले. 

स्वप्नीलने तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. प्रथम २०१६ मध्ये तो असिस्टंट कमांडंट झाला. नंतर २०१८ मध्ये ५२५ वी रँक मिळवून इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये प्रवेश केला. नोकरी करतानाच त्याच्यातील स्पर्धक विद्यार्थी स्वस्थ बसू देत नव्हता. त्याने २०२० मध्ये ही परीक्षा दिली आणि ४४८ वी रँक मिळवत तो आयएएस/आयपीएस संवर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला. मार्च २०१८ पासून स्वप्नील गझियाबाद ट्रेनिंग सेंटरला क्लास-वन अधिकारी म्हणून नियुक्त आहे. तसेच जयपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, की संधीचे सोने करता येऊ शकते, हे स्वप्नीलने दाखवून दिले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swapnil Pawar Patil from Nyahalod taluka sat for UPSC examination and passed