
अखेर शासनाने महापालिका/पालिका/नगरपंचायती यांच्याकडील शिक्षकांच्या सेवा कायमस्वरूपी वर्ग करण्यास अटी-शर्तीवर मान्यता दिली आहे.
धुळे : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या अन्य नागरी/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत बदली/सेवा वर्ग करण्यास शासनाने अटी-शर्तींवर मान्यता दिली आहे. धुळे महापालिका शाळांचा विचार करता धुळे महापालिका शाळांमधून इतरत्र जाणारे सहा-सात, तर इतर ठिकाणांहून धुळे महापालिका शाळांत येणारे असे दहा-बारा शिक्षक रांगेत आहेत.
आवश्य वाचा- सीसीआय, पणनकडून १४ लाख क्विंटल कापूस खरेदी
कौटुंबिक तसेच इतर विविध कारणास्तव बदली/सेवा वर्ग करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर संबंधित शिक्षकांकडून सतत मागणी होत होती. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार/खासदार यांच्याकडूनही शासनाकडे शिफारशी तसेच पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने महापालिका/पालिका/नगरपंचायती यांच्याकडील शिक्षकांच्या सेवा कायमस्वरूपी वर्ग करण्यास अटी-शर्तीवर मान्यता दिली आहे. सेवा वर्ग करण्याबाबत मान्यतेचे अधिकार संबंधित महापालिका आयुक्त, पालिका-परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
अटी-शर्ती अशा
ज्या महापालिका/पालिका/नगरपंचायती अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांनी सेवा वर्ग करण्याची मागणी केली असेल अशा सेवा वर्ग करण्यासाठी संबंधित दोन्ही नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. नियुक्ती मागितलेल्या ठिकाणी लागू असलेल्या सेवाविषयक आणि वेतनाविषयी तरतुदी संबंधित शिक्षकांना स्वीकारणे बंधनकारक राहील, मूळ नियुक्तीच्या ठिकाणी असलेली सेवाज्येष्ठता बदलीच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी गमवावी लागेल यास संबंधित शिक्षकांची पूर्वसंमती आवश्यक राहील. नवीन ठिकाणी त्यांची ज्येष्ठता कनिष्ठ राहील, सेवा वर्ग करण्याची बदलीची मागणी करणाऱ्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती नियमित पदावर झालेली असावी. तसेच परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला असावा. संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसावी अथवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नसावेत. एकाच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून एकापेक्षा जास्त शिक्षकांचे अर्ज असतील तर ज्या नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नियुक्ती मागितली आहे तेथे एकच पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठता विचारात घ्यावी. तथापि, महिला शिक्षकांबाबत प्राधान्य राहील. शिक्षणसेवकांना बदली प्रक्रिया लागू नसेल. तथापि, अपवादात्मक प्रकरणी पूर्वमान्यतेने अशी बदली करता येईल. यामध्येही महिला शिक्षणसेवकांस प्राधान्य राहील. एकाच जिल्ह्यातील नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेवा वर्ग करता येणार नाही. सेवा वर्ग करण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकांची निवड ज्या प्रवर्गातून झाली असेल त्या प्रवर्गातील पद संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिक्त असणे आवश्यक राहील.
आवर्जून वाचा- भारतातील अशी टेकड़ी जिथे बंद कार खाली नव्हे तर वर चढ़ते..काय आहे रहस्य
धुळे महापालिकेतील स्थिती
धुळे महापालिकेच्या शहरात एकूण २० शाळा (ऊर्दू माध्यम-१२, मराठी-माध्यम- ८) सुरू आहेत. यातील प्रामुख्याने ऊर्दू माध्यमाच्या शाळांतील पाच-सहा शिक्षकांना बदली हवी आहे. असा विषय नुकताच महासभेपुढेही आला होता. याशिवाय इतर ठिकाणांहून धुळ्यात येण्यास इच्छुक असलेले दहा-बारा शिक्षक असल्याची माहिती मिळाली.
संपादन- भूषण श्रीखंडे