Bhongrya Bazar : बोरदला आज भोंगऱ्या बाजार; होळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी बांधवांचे विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Local tribal brothers celebrating the festival of Holi

Bhongrya Bazar : बोरदला आज भोंगऱ्या बाजार; होळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी बांधवांचे विविध उपक्रम

तळोदा (जि. नंदुरबार) : सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी समाज बांधवांसाठी होळी हा सर्वात महत्वपूर्ण सण असून, होळीपूर्वी आठवडाभर चालणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला ठिकठिकाणी उत्साहात सुरवात झाली आहे.

तालुक्यातील बोरद येथेही होळीच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. ५) भोंगऱ्या बाजार भरणार असून, सातपुड्यातील हजारो आदिवासी बांधव यात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, भोंगऱ्या बाजारात आदिवासी वाद्य, आदिवासी पेहराव, नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडते. त्यामुळे बोरद येथील भोंगऱ्या बाजाराची उत्सुकता निर्माण झाली आहे. (today Bhongrya Bazar at Borad Various activities of tribal brothers on eve of Holi nandurbar news)

बोरद (ता. तळोदा) हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले बारा हजार लोकसंख्येचे गाव असून, गावाला आसपासची ४५ आदिवासी खेडी जोडली गेली आहेत. तळोद्यानंतर सर्वात मोठी बाजारपेठ, तसेच गुजरात व मध्यप्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवर वसलेले गाव असल्याने या परिसरातील सर्व आदिवासी बांधव होळीचे साहित्य खरेदीसाठी येथे येत असतात.

दरम्यान, होळीचा पूर्वसंध्येला भरणाऱ्या बाजाराला भोंगऱ्या बाजार म्हटले जाते. होळी हा आदिवासी बांधवांचा मुख्य सण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने आदिवासी समाजबांधव रोजगारासाठी वर्षभर बाहेरगावी स्थलांतरित असतात.

मात्र, दोन दिवस होळी करण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतात. विशेष म्हणजे तळोदा तालुक्यात फक्त बोरद येथेच भोंगऱ्या बाजार भरत असल्याने, या बाजाराला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या अनुषंगाने विविध साहित्य विक्रीची, तसेच किराणा व कापड दुकाने येथे थाटली जातात.

आदिवासी बांधव आपल्या समाजाचा पारंपरिक पेहेराव करून ढोलच्या तालावर नाचत, गात या ठिकाणी येतात. तेथे आपले सर्व नातेवाईक एकत्र येऊन भेट होणे हा देखील या मागचा उद्देश असतो.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शिवाय मनोरंजनातून आनंद व्यक्त करत भोंगऱ्या बाजारात सामूहिक नृत्याचा कार्यक्रमदेखील होत असतो. हा आनंदोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाजार करण्यासाठी आलेले परिसरातील बांधव सायंकाळी होळी पूजनाचे साहित्य घेऊन आपापल्या गावी परत जातात.

त्यात फुटाणे, दाळ्या, हार, कंगण, गूळ, खजूर, नारळ आदींचा समावेश असतो. दुसऱ्या दिवशी आपल्या गावी होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावाचा मुखिया होळी पूजन करून होळी पेटवतो. होळीला सर्व गावकरी एकत्रित येऊन पूजन करून नैवद्य अर्पण करतात, त्यानंतरच भोजन करतात.

लाखोंची उलाढाल शक्य

दरम्यान, बोरद येथील भोंगऱ्या बाजारासाठी परिसरातील बांधव हजारोंच्या संख्येने येत असतात. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून बोरद ग्रा. पं. प्रशासनाकडून एक आठवडा अगोदर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, नागरिकांसाठी पाण्याची तसेच आरोग्य विभागामार्फत चोवीस तास आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

बोरद गावाला सध्या यात्रेच्या स्वरूप आलेले असून बाजारपेठेत चैतन्य संचारले आहे. दोन दिवसात विविध साहित्य खरेदी, कापड, किराणा सामान यांच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल भोंगऱ्या बाजारातून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :NandurbarHoli