पर्यटकांमुळे वीकेंडला घाटरस्त्यांवर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

सेल्फी पॉइंट, धबधबे, धरणांच्या ठिकाणी वन विभाग आणि ग्रामीण पोलिस यांची संयुक्त पथके नेमण्यात आली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन पर्यटकांची गर्दी होत असल्यास त्यांना अटकाव केला जाईल. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. 
- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

नाशिक - पावसाळा सुरू झाला, की घाटमाथ्यांवर ओल्याचिंब निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढते. अशीच अवस्था गेल्या वीकेंडला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस मुसळधार कोसळत असताना त्याचा आनंद लुटण्यासाठी शहर, परजिल्ह्यातील पर्यटकांनी वाहनांसह गर्दी केल्यामुळे घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

इतकेच नव्हे तर धोकादायक वळणांवर वाहने थांबवून पर्यटकांकडून ‘सेल्फी’ही घेतले जात असल्याने यातून भीषण दुर्घटनेचीही शक्‍यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी पोलिसांची अनुपस्थिती दिसून आली असली तरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

संततधारेने इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवरील धबधबे वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी तर ओहोळ-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा या पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिकसह लगतच्या मुंबईतून पर्यटक वीकेंडसाठी घाटमाथ्याकडे धाव घेत आहेत. विशेषत: घाटरस्ते अरुंद असून, डोंगररांगांमधून हे रस्ते असल्याने काही ठिकाणी अत्यंत धोकादायक वळणे आहेत. त्यात मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर वाहत येणारा चिखल यामुळे रस्तेही धोकादायक झालेले असताना, अशा मार्गावरून भरधाव वाहने चालविण्याने दुर्घटनेची शक्‍यता आहे. काही धोकादायक वळणांवर पर्यटक वाहने थांबवून ‘सेल्फी’ घेतात. यातूनही दुर्घटनेची शक्‍यता आहे.  

धोकादायक घाटरस्ते
वीकेंडला नाशिक-त्र्यंबक रोडवरील पहिनेचा घाटरस्ता, त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रस्त्यावरील दुगारवाडी धबधबा, इगतपुरीतील वाडा घाटरस्ता, कसारा घाट, इगतपुरी-घोटी घाटरस्ता, घोटी-भंडारदरा घाटरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची अक्षरश: गर्दी असते. दोन वर्षांपूर्वी पहिनेच्या डोहात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. 

गांभीर्याचा अभाव
पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तर नाशिक ग्रामीण पोलिसांनाही याचे गांभीर्य नसल्याचेच त्यांच्या गैरहजेरीतून समोर आले आहे. पोलिसांकडून केवळ घाटरस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. काही मार्गांवर नाकाबंदीच्या ठिकाणीही पोलिसांकडून कोणत्या सूचना पर्यटकांना दिल्या जात नाहीत. त्यामुळे घाटमाथ्यावरील धोकादायक परिस्थितीमध्ये मार्ग बंद करणे अपेक्षित आहे. 

खबरदारीच्या उपाययोजना
ग्रामीण पोलिस आणि वन विभाग यांचे संयुक्त पथक पावसाळी पर्यटनांच्या ठिकाणी नेमले आहे. मद्यपींच्या शक्‍यतेने ग्रामीण वाहतूक शाखेकडून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हचीही कारवाई केली जाणार आहे. कुटुंबीयांसह पर्यटक येत असल्याने महिला पोलिस कर्मचारी, रेस्क्‍यू ऑपरेशन टीम अशा उपाययोजना केल्याचे ग्रामीण पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist Weekend Ghat Road Traffic