वनपट्टेधारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षानंतर मिळाला न्याय!

भगवान जगदाळे
बुधवार, 9 जानेवारी 2019

निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षांनंतर न्याय मिळाला. याकामी भाजपा आदिवासी आघाडीचे नेते मोहन सूर्यवंशी व नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लिलाबाई सूर्यवंशी यांनी विशेष पाठपुरावा केला.

संबंधित आदिवासी बांधव सन 1970 पासून वनपट्टे खेडत होते. त्यापोटी त्यांना 29 जानेवारी 1970 मध्ये 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा देखील झाली होती. त्यांनी 30 जानेवारी 1970 ते 14 एप्रिल 1970 या कालावधीत धुळे जिल्हा कारागृहात शिक्षाही भोगलेली असून, 14 एप्रिल 1970 रोजी धुळे जिल्हा कारागृहातून त्यांची मुक्तता झाली होती. परंतु, सर्व सत्य परिस्थिती असतानाही 49 वर्षांपासून वनपट्टे धारकांना न्याय मिळत नव्हता. अखेरीस मोहन सूर्यवंशी यांच्याकडे या गावांच्या वनपट्टे धारकांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर मोहन सूर्यवंशी यांनी सर्व वनपट्टे धारकांचे कागदोपत्री पुरावे स्वतः गोळा केले. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांना निवेदने देऊन व वैयक्तिक भेटी घेऊन सर्व हकीकत सांगितली व सर्व 54 वनपट्टे दावे मंजूर करून घेतले.

5 जानेवारीला वनपट्टे वाटपाच्या दिवशी वनपट्टे धारकांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून मोहन सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले आहे. कायमचे उपजीविकेचे साधन मिळवून दिल्याने आगामी काळात सूर्यवंशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत वनपट्टे धारकांनी सूर्यवंशी यांचे विशेष आभार मानले आहेत. वनपट्टे वाटपासाठी मोहन सूर्यवंशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील वन हक्क समितीचे जिल्हा समन्वयक संजय बोरसे, सहाय्यक पी. एस. जगताप, वनपाल कोंडाईबारी, वनरक्षक व तलाठी एस.डी.साळुंखे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal brothers get justice after 48 years!