आदिवासी भगिनींनी बनविली चक्क सोन्याची भाजी!

apta leaf
apta leaf

भुसावळ - मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे आज वनभाजी स्पर्धा पार पडली. यात विविध रानभाज्यांबरोबरच चक्क सोन्याची भाजी (आपट्यांच्या पानांची) आदिवासी भगिनींनी बनविली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

यावेळी आदर्श गाव पाटोदाचे (जि.औरंगाबाद) शिल्पकार, सरपंच भास्करदादा पेरे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पाच सूत्री कलमाची माहिती दिली. या स्पर्धेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामविकास समिती (चारठाणा) यांनी आयोजन केले होते. 

या रानभाज्यांचा समावेश
स्पर्धेसाठी आदिवासी महिलांनी रानभाज्या तयार करून आणल्या होत्या. यात भुई आवळी, तरोटा, दुडीची फुल त्याची पान, कोवळा बांबू, केन, कटमणी, अंजनाची कोवळी पान,अंबाडी, फांजी, रानभेंडी, कार्टून अशा अनेक भाज्यांचा समावेश होता. 

सोन्याच्या भाजीची चर्चा
वनभाजी स्पर्धेत विशेष चर्चा होती ती म्हणजे सोन्याच्या भाजीची. आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटतो. त्या पानांची भाजी होऊ शकते ही कल्पनादेखील शहरी माणूस करू शकत नाही. मात्र आदिवासी भगिनींनी या झाडाची कोवळी पाने तोडून त्याची भाजी तयार केली होती. ही भाजी सर्वजण उत्सुकतेने कशाची आहे म्हणून विचारत होते. काही भगिनी रानभाज्या असलेले थालीपीठ, दशम्या व भाकरी देखील आणलेल्या होत्या. स्पर्धकांना किती भाज्यांची नाव व त्याची उपयुक्तता सांगता येते यावरून परीक्षक मार्क देत होते.

पाच गोष्टींवर गावाने काम करावे
यावेळी भास्करदादा पेरे-पाटील म्हणाले, की गावाने स्वच्छ पाणी पिणे, वापरलेले पाणी जमिनीत जिरवणे, झाडे लावणे, गावाची नियमित साफसफाई करणे व मुलांना शिकवणे या पाच गोष्टींकडे गावाने लक्ष द्यावे. आज माणसाला अडीच ते तीन लिटर पाणी लागते मात्र एक माणूस पन्नास लीटर पाणी वापरतो त्यातील ४७ लिटर वाया घालवतो. आपण वापरलेले पाणी जमिनीत जिरवले पाहिजे. जो माणूस आयुष्यात चार झाडे लावत नाही त्याला मेल्यानंतर जाळण्यासाठी चार क्विंटल लाकूड कशाला द्यायचे. विनोदी पद्धतीने प्रबोधनही त्यांनी केले. 

यांची होती उपस्थिती
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, सरपंच बेलापुरकर, स्पर्धेचे सह संयोजक सुधाकर धाडे, प्रांत प्रमुख विनय कानडे, तालुका संघचालक गजानन चौधरी, गणेश इंगळे, जितेंद्र जाधव, राजेंद्र वाघ, विजय पुरकर आदींची उपस्थित होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com