अठ्ठावीस दुचाकीसह भामटा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याकडून २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

नंदुरबार : दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याकडून २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याकडून चोरीचे २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मागील काळात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरी झाल्या होत्या. मागील आठवड्यात आठ दुचाकी चोरीस गेल्या.या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोरंबा (ता. धडगाव) येथील भिका नावाचा व्यक्ती शहादा, नंदुरबार, तळोदा व गुजरात राज्यातील काही शहरांमधून दुचाकी चोरून खडक्या गावात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. श्री. नवले यांनी तत्काळ पथक तयार करुन गोरंबा गावाकडे रवाना केले. पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी साधूचे वेषांतर करुन भीक मागण्याच्या उद्देशाने गावात फिरून भिका पाडवीचा शोध घेतला. जंगलात उंच टेकडीवर एका छोट्याशा झोपडीत भिका पाडवी मिळून आला. पथकाने झोपडीच्या परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.त्याचे नाव भिका मोत्या पाडवी असे असून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. जंगलात चाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवलेल्या १८ दुचाकी तसेच परिसरात विकलेल्या १० अशा एकूण २८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या दुचाकीची किंमत सहा लाख रुपये होती. शहादा परिसरातून चोरी झालेल्या ११, तळोदा तालुक्यातील चोरी झालेल्या ४, सारंगखेडा येथून चोरी झालेल्या तीन, नंदुरबार येथून एक व गुजरात राज्यातील निझर येथून चोरी झालेली एक अशा २१ दुचाकी पथकाने जप्त केल्या. पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस कॉन्स्टेबल दीपक गोरे, योगेश सोनवणे, विकास अजगे, किरण पावरा, विजय ढिवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thief arrested