जैताणेतील दोन युवकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू!

Machindra-and-Sunil
Machindra-and-Sunil

निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील रहिवासी मच्छिंद्र देवमन खलाणे (वय-34) व सुनील लुका जाधव (वय-30) हे दोघेही युवक सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जैताणे गावशिवारातील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडले. ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जैताणे शिवारातील देवमन गंगाराम खलाणे यांच्या शेतात त्यांचा लहान मुलगा मच्छिंद्र देवमन खलाणे हा त्याचा मित्र सुनील लुका जाधव याच्यासह कामानिमित्त गेला होता. मच्छिंद्र शेततळ्यातील पाईपमध्ये अडकलेली घाण काढायला गेला असता तो अचानक पाय घसरून पाण्यात बुडाला. त्याचा मित्र सुनील त्याला वाचविण्यासाठी गेला असता तोही पाण्यात बुडाल्याने दोघांचाही पाण्यातच बुडून मृत्यू झाला. ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

त्यानंतर नातेवाईक व मित्रमंडळीच्या मदतीने मृतदेह जैताणे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मच्छिंद्र व सुनील यांना मृत घोषित केले. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयतांचे शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. जैताणेतील स्मशानभूमीत रात्री उशिरा दोघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार झाले. मयत सुनीलचे चुलत भाऊ हांडू उत्तम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाचला निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वामन चौधरी घटनेचा पुढील तपास करत आहेत.

गावात हळहळ...
मनमिळाऊ व मीतभाषी स्वभावाचा युवक मच्छिंद्र खलाणे हा भाऊ व वडिलांसह शेती व दुग्धव्यवसाय करत होता. त्यामुळे त्याचा दांडगा जनसंपर्क होता. तर मयत सुनील जाधव हाही शेती व्यवसाय व व्यापार सांभाळून उरलेल्या वेळेत सामाजिक कार्य करायचा. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्याची ख्याती होती. सुनीलने यापूर्वी जैताणे ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढवली होती. अचानक घरातील कर्ते युवक गेल्याने खलाणे व जाधव कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. दोन्हीही मयतांच्या पाठीमागे आई-वडील, भाऊ-बहिणींसह प्रत्येकी एक मुलगा व एक मुलगी अशी चिमुकली बालके असून ऐन तारुण्यात त्यांच्या पत्नींना वैधव्य आले आहे. या घटनेमुळे आबालवृद्धांसह गावकऱ्यांना शोक अनावर झाला होता. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गावातील तरुणांनी काळजी घेतली पाहिजे, असा सूर गावकऱ्यांमधून उमटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com