KBCNMU : विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा द्या; विद्यापीठ विकास मंचाची पालकमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kbcnmu

KBCNMU : विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा द्या; विद्यापीठ विकास मंचाची पालकमंत्र्यांकडे मागणी

धुळे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (KBCNMU) धुळे उपकेंद्रासाठी जागा द्यावी, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचाने रविवारी (ता. ५) धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. (University Development Forum demanded that Guardian Minister Girish Mahajan provide space for the KBCNMU sub centre Dhule news)

या मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्याचे विद्यापीठ विकास मंचाने म्हटले आहे.

सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्र असावे, अशी तरतूद असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळ्यात सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून विद्यापीठ विकास मंचातर्फे करण्यात येत आहे.

याबाबत पाठपुरावा करण्यासाठी विद्यापीठाची समितीदेखील स्थापन करण्यासाठी विद्यापीठ विकास मंचाने पाठपुरावा केला होता. त्या समितीच्या शिफारशीनुसार वडेल शिवारातील जागा उपलब्ध असून, जागेची मागणी विद्यापीठ प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

याबाबत सिनेट सदस्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा बैठका झाल्या, मात्र अद्याप जागा देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित झाले नसल्याचे विद्यापीठ विकास मंचाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जागा देण्याच्या मागणीचे निवेदन मंचातर्फे पालकमंत्री महाजन यांना दिले.

विद्यापीठ विकास मंच विभागप्रमुख तथा सिनेट सदस्य नितीन ठाकूर, माजी सिनेट सदस्य प्रदीप कर्पे, खासदार डॉ. सुभाष भामरे, विद्यापीठ विद्यापीठ विकास मंच धुळे जिल्हाप्रमुख रोहित चांदोडे, विराज भामरे, अभाविप शहरमंत्री वैभवी ढिवरे, ओंकार मोरे आदी उपस्थित होते.