UPSC Result: आसिम खान ऊर्दू माध्यमातून 'देशात' प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC Result: आसिम खान ऊर्दू माध्यमातून 'देशात' प्रथम

UPSC Result: आसिम खान ऊर्दू माध्यमातून 'देशात' प्रथम

धुळे : येथील मिल्लतनगरमधील सामान्य कुटुंबातून आसीम किफायत खान याने २०२१ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ऊर्दू माध्यमातून ५५८ वा रँक मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. ते एकमेव आयएएस उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या माध्यमातून धुळ्याच्या यशाचा झेंडा देशात रोवला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: बीड हादरले! पत्नी, मुलीचा गळा चिरुन खून; पतीची आत्महत्या

आसीम खान यांनी धुळे शहरातील मुस्लिम समाजातून एकमेव यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मानही मिळविला आहे. त्यांचे वडील किफायत खान व आई रईसा खान येथील महापालिकेच्या ऊर्दू शाळेतील निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. तेही ऊर्दू माध्यम शाळेत शिक्षक आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या खान कुटुंबात आसीम सर्वांत धाकटे आहेत. त्यांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील देवपूरमधील एल. एल. सरदार ऊर्दू हायस्कूलमध्ये झाले. बारावीनंतर आसीम खान यांनी जळगाव येथील बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बीई बायोटेकचे शिक्षण पूर्ण केले.

नंतर ते यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मुंबईत दाखल झाले. तेथील हज हाउस येथे आयएएस ॲकॅडमीत वर्षभर या परीक्षेची तयारी केली. पुढे दिल्ली गाठत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दोन ते तीन वर्षांपासून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. सुरवातीला ऊर्दू माध्यमांची पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना तयारी करण्यात अडचण येत होती.

त्यावर मात करत त्यांनी काविश भाग १ व २, अशी दोन पुस्तके स्वतः लिहिली आणि ते दिल्ली येथील किरण पब्लिकेशनने प्रकाशित केली आहेत. अशा अनेक अडचणी असताना आसीम खान यांनी मार्ग काढत परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्यात प्रथम दोन ते तीन प्रयत्नांत अपयश आले, तरी त्यांनी निराश न होता प्रयत्न सुरूच ठेवले. एकवेळ ते मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, मुलाखतीत अपयश आले. नंतर त्यांनी दुसऱ्या फेरीत यश मिळवले. मुस्लिम समाजात २०१२ नंतर कुठल्याही विद्यार्थ्याने ऊर्दू माध्यमातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवले नव्हते. या वर्षी आसीम खान यांच्या रूपाने यश मिळाले.

जिद्दी राहा, यश मिळेल : खान

यशाबद्दल आसीम खान म्हणाले, की जिद्दीने अभ्यास केला, तर ध्येय गाठण्यासाठी भाषाही कधीही अडथळा ठरत नाही. त्यामुळे ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी भाषेचा न्यूनगंड न ठेवता मेहनत करावी व स्पर्धा परीक्षेतील स्वप्न साकार करावे. त्यांनी यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ, मित्रमंडळी, मुंबईतील हज हाऊस आणि दिल्लीतील जामियामिलिया इस्लामिया विद्यापीठातील मार्गदर्शकांना दिले.

loading image
go to top