व्हॅलेंटाईन डे 2019 : ‘पॉलिहाउसनगरी’त ‘व्हॅलेंटाइन’ ३० कोटींचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नाशिक - मोहाडी-जानोरी (ता. दिंडोरी) या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांनी ‘पॉलिहाउसनगरी’ म्हणून जगाच्या फुलशेतीच्या नकाशावर छबी उमटवली आहे. या दोन्ही गावांमधून २०० एकरांहून अधिक पॉलिहाउस आणि ३५० एकर खुल्या क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. या गावांमधील शेतकऱ्यांनी यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ३० कोटींहून अधिक रकमेच्या गुलाबाचे उत्पादन घेतले आहे.

नाशिक - मोहाडी-जानोरी (ता. दिंडोरी) या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांनी ‘पॉलिहाउसनगरी’ म्हणून जगाच्या फुलशेतीच्या नकाशावर छबी उमटवली आहे. या दोन्ही गावांमधून २०० एकरांहून अधिक पॉलिहाउस आणि ३५० एकर खुल्या क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. या गावांमधील शेतकऱ्यांनी यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ३० कोटींहून अधिक रकमेच्या गुलाबाचे उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यात थंडी रेंगाळल्याने गुलाबाच्या उत्पादनात यंदात ३० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्याचे थेट पडसाद बाजारपेठेतील भावावर उमटले असून, मागील वर्षी २० फुलांचे एक बंडल १७० ते १८० रुपयांमध्ये विकले गेले असताना यंदा मात्र २५० रुपयांपर्यंत बंडलला भाव मिळतोय. ‘डच’ वाणाच्या ‘टॉप सिक्रेट’ आणि ‘बोर्डेक्‍स’ फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून, पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या ‘अविलांच’, पिवळा ‘सोलर’, गुलाबी ‘रिव्हायव्हल’, गडद गुलाबी ‘हॉटशॉट’, पांढरट गुलाबी ‘जुमेलिया’ याही वाणांचे उत्पादन घेतले जाते. युरोपामध्ये बर्फ असल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’साठी असलेल्या गुलाबाची मागणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत रोपांचे ‘कटिंग’ केले. त्यास फुटवे येऊन २५ जानेवारीपासून फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरवात झाली. या फुलांची काढणी अंतिम टप्प्यात पोचली आहे.

कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या फुलांची निर्यात होत असली, तरीही बहुतांश फुले मुंबई, दिल्लीमधून युरोपप्रमाणेच जपान आणि इतर देशांमध्ये व्यापारी निर्यात करतात. यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठीची गुलाबाची फुले बाजारपेठेत रवाना झाली असून, आता पुढच्या हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
- जालिंदर गोवर्धने, गुलाब उत्पादक, मोहाडी

दिल्लीत १८ तासांत पोचतात फुले
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टेम्पोमधून फुले पाठवली जातात. मात्र, देशांतर्गत शहरांमध्ये ही फुले रेल्वेने पाठवण्यात येतात. दिल्ली आणि कानपूरमध्ये रेल्वेने ही फुले पोचण्यासाठी १८ ते २० तासांचा कालावधी लागतो. लखनौ, बडोदा, अहमदाबाद, इंदूर, झाशी, नागपूर, रायपूरलाही फुले पाठवली जातात. 

उत्पादनाचा खर्च (एकरासाठी रुपयांमध्ये)
     वाहतूक - ६० ते ६५ हजार
     बॉक्‍स-रॅपर - २५ हजार
     खते व इतर निविष्ठा - ५० हजार
     मजुरी - ३० हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day 2019 Rose Production Polyhouse