Vidhan Sabha 2019 : जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे

निखिल सूर्यवंशी
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

भाजपपुढील आव्हाने
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातील धुळे ग्रामीणमधून सरासरी ९९ हजार, धुळे शहरातून २९ हजार, शिंदखेडा मतदारसंघातून ५३ हजारांचे मताधिक्‍य भाजपला मिळाले. धुळे ग्रामीण, शिंदखेड्यात अपेक्षित मताधिक्‍य मिळाल्याने भाजपला हे मतदारसंघ ‘सेफ’ वाटताहेत. धुळे महापालिकेची सत्ता बहुमताने हाती येऊनही अल्प मताधिक्‍य मिळाल्याने भाजपपुढे ते आगामी विधानसभा निवडणुकीत वाढीसाठी बरीच आव्हाने आहेत. आदिवासीबहुल साक्री, शिरपूर मतदारसंघांत काँग्रेसची विजयाची परंपरा खंडित करण्यासाठी भाजपने डावपेचांची आखणी चालवली आहे.

विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. ही कोंडी भाजपचे खानदेशातील प्रमुख नेते कशी सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

धुळे जिल्ह्यातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मोदी लाटेचा परिणाम दिसला नाही. शिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, धुळ्यातून ऐनवेळी भाजपची उमेदवारी मिळविणारे अनिल गोटे आमदार झाले.

सद्यःस्थितीत पक्षातील वितुष्टामुळे गोटे यांनी भाजपसह आमदारकीचा राजीनामा दिलाय. या पाठोपाठ लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून भाजपचे खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दुसऱ्यांदा निवडून आले.

भाजपने या जिल्ह्यातून दोन मंत्रिपदे दिल्याने शिवसेनेनेही मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना मंत्रिपद दिले, ते जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर डॉ. भामरे यांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. तथापि, युतीचे तीन मंत्री असताना लगतच्या जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते तथा जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना धुळे जिल्ह्याचीही जबाबदारी दिली. या संधीचे सोने करत भाजपच्या या प्रभावी आजी-माजी मंत्र्यांनी धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा पालिका, शिंदखेडा पंचायत समितीत सत्ता स्थापली. त्यामुळे भाजपची ही घोडदौड काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसाठी चिंतेची आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. भामरे यांच्या विजयाने घवघवीत यश मिळाल्याने भाजपने उघडपणे मिशन धुळे जिल्हा परिषद’ हाती घेऊन पाचही विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत ताब्यात घेण्याची तयारी चालवली आहे. असे असले तरी भाजपमधील वाढते इच्छुक उमेदवार आणि पूर्वीपासून तयारीला लागलेले या पक्षातील काही इच्छुक यांच्यातील स्पर्धा नेत्यांसाठी कमालीची डोकेदुखी ठरते आहे. अशात आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली आहेत. त्यांना अपेक्षित मतदारसंघांत भाजपने उमेदवारी दिली, सत्ताकेंद्र टिकवून ठेवण्यासाठी पाठबळ दिले, तर त्यांचे प्रवेश होऊ शकतील, असे मानले जाते.

तसे झाल्यास जिल्हा भाजपमय आणि विरोधकच न उरू देण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होताना दिसू शकतील. त्यातून काँग्रेसचा गड नेस्तनाबूत होईल. या विषयी आघाडीचे वरिष्ठ नेतेही धास्तावले आहेत.

भाजप एकीकडे करिष्मा घडवीत असताना शिवसेनेचे नेते भुसे जिल्ह्यात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. शिवसेनेचे गटबाजीमुळे महापालिका आणि इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ घटत गेले. या सर्व घडामोडीत स्थानिक शिवसेना नेत्यांनी धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची जागा मागितली आहे. याउलट भाजपने पाचही मतदारसंघांतील जागा पदरात पाडू, असे सांगत शिवसेनेचे खच्चीकरण सुरू केल्याचे दिसते. एकूणच या बदलत्या घडामोडींमध्ये जागांसह उमेदवार निवडीत मंत्री महाजन, मंत्री रावल, खासदार डॉ. भामरे आणि मंत्री भुसे यांचाच खरा कस लागणार आहे. त्यांनी उमेदवार निवडीचा चेंडू तूर्त ‘सर्व्हे’कडे टोलवला आहे. शिंदखेड्याच्या जागावाटपावरून काँग्रेस आघाडीत वाद सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Dhule District BJP Congress Politics