Vidhansabha 2019 : आघाडीच्या आशा पल्लवीत

Dhule-Vidhansabha
Dhule-Vidhansabha

गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेवर आले. तरीही लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सहापैकी फक्त दोन जागांवर भाजप, एका जागेवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. उर्वरित तीन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. आता नरेंद्र मोदी लाट ओसरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी गतवैभव मिळवण्यासाठी तयारीला लागलेत. 
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपचे नेते, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे रिंगणात असल्याने हायप्रोफाईल निवडणूक झाली. त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांना रिंगणात उतरवले. विकासाच्या मुद्यांसह जातीय समीकरणे समोर ठेवत निवडणूक लढली गेली. रणधुमाळीत धुळे शहरातील भाजपचे बंडखोर नेते अनिल गोटे वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांनी पक्षीय उमेदवारी भक्कम राहण्याच्या दृष्टीने प्रचारात झोकून दिले. संभाव्य इच्छुकही मागे नव्हते. 

धुळ्यात कडवी लढत
आमदार पाटील यांनी ‘धुळे ग्रामीण’ची दावेदारी कायम ठेवण्याच्या बोलीवर ‘लोकसभे’ची उमेदवारी स्वीकारली. ते विजयी झाल्यास वडील माजी मंत्री रोहिदास पाटील उमेदवार असतील. त्यांच्यापुढे भाजप-शिवसेनेचे कट्टर आव्हान असेल. धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटेंनी बंडखोरी करत ‘लोकसभे’साठी उमेदवारी केली. त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे गोटे ‘लोकसंग्राम’चे उमेदवार असू शकतील. डॉ. भामरे विजयी झाल्यास भाजपला धुळे शहरात नवीन चेहरा शोधावा लागेल; अन्यथा डॉ. भामरे उमेदवार असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपपुढे ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे कडवे आव्हान असेल. 

रावल हॅटट्रिक साधणार?
शिंदखेडा मतदारसंघात हॅटट्रिक साधणारे रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री भाजपचे जयकुमार रावल यांचा एकछत्री अंमल आहे. त्यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हान मोडीत काढायचे असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीला मेहनत घ्यावी लागेल. मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्यापुढे ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष तथा माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचे आव्हान असेल. त्यांनी अपक्ष लढण्याचे ठाणले आहे. तेथे भाजप, वंचित बहुजन आघाडी यांचा प्रभाव निकालानंतर स्पष्ट होईल. मालेगाव बाह्य मतदारसंघात हॅटट्रिक साधणारे शिवसेनेचे नेते तथा ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यापुढे अपक्षांसह ‘राष्ट्रवादी’च्या इच्छुकांचे आव्हान असेल. बागलाण मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’च्या आमदार दीपिका चव्हाण यांच्यापुढे भाजपचे उमाजी बोरसे यांचे आव्हान असेल, असे सध्याचे चित्र आहे.

‘विधानसभे’साठी प्रमुख इच्छुक उमेदवार
भाजप - अनुप अग्रवाल, डॉ. माधुरी बोरसे, रवी बेलपाठक, विनोद मोराणकर, गोपाळ केले, मनोहर भदाणे, राम भदाणे, प्रा. अरविंद जाधव, जयकुमार रावल, उमाजी बोरसे. 

शिवसेना - प्रा. शरद पाटील, हिलाल माळी, हेमंत साळुंखे, शानाभाऊ सोनवणे, दादा भुसे.  

राष्ट्रवादी काँग्रेस - राजवर्धन कदमबांडे, किरण गुलाबराव पाटील, संदीप बेडसे, जयंत पवार, राजेंद्र भोसले, दीपिका चव्हाण. 

काँग्रेस - रोहिदास पाटील, श्‍यामकांत सनेर, जुई देशमुख, ज्ञानेश्‍वर भामरे, आसिफ शेख.  

लोकसंग्राम संघटना - अनिल गोटे. 

समाजवादी पक्ष - विजयसिंह राजपूत. 

अपक्ष - मौलाना मुफ्ती इस्माईल, अद्वय हिरे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com