Vidhansabha 2019 : आघाडीचा वारू रोखण्याचे युतीपुढे आव्हान

Dindori-Constituency
Dindori-Constituency

महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल.

लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय कोलांटउड्यांमुळे आदिवासींसाठी राखीव दिंडोरी मतदारसंघ चर्चेत राहिला. मतदानावेळी मतदारराजा चकार शब्द बोलला नसल्याने राजकारण्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. त्यामुळे एकीकडे हा सत्ताधाऱ्यांबद्दल रोषाचा दावा आघाडीतर्फे होतोय, तर युतीतर्फे सुप्त लाट, अशी मांडणी होते. प्रत्यक्षात कुणाचे खरे, हे मतमोजणीतून स्पष्ट होईल; तरीही ही निवडणूक विधानसभेची पायाभरणी ठरली, हे नक्की.

मागील विधानसभा निवडणुकीत दिंडोरी-पेठ मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ, कळवण-सुरगाणा मतदारसंघामधून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे. पी. गावीत, चांदवड-देवळा मतदारसंघामधून भाजपचे डॉ. राहुल आहेर, येवल्यातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, नांदगावमधून राष्ट्रवादीतर्फे भुजबळांचा मुलगा पंकज, निफाडमधून शिवसेनेचे अनिल कदम यांनी बाजी मारली. पण, आता राजकीय पट बदललाय, हे खरे.

शिवसेनेचे माजी आमदार धनराज महालेंनी लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी केल्याने दिंडोरी-पेठमधील शिवसेनेतील पोकळी भरून काढण्यासाठी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी राजकीय कूस बदलली. त्याचाच भाग म्हणून त्यांनी भाजपच्या डॉ. भारती पवारांचे समर्थन केले. मतदानावेळी चारोस्करांचा प्रभाव असलेल्या आदिवासी पट्ट्यात निराळे घडले. पेठमधील जिल्हा परिषदेचे सदस्य भास्कर गावीत यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली असली, तरी त्यांची चारोस्करांपुढे किती डाळ शिजणार, हा प्रश्‍नच. डॉ. पवारांच्या राष्ट्रवादी सोडून भाजपची उमेदवारी करण्याने कळवण-सुरगाण्याचे राजकारण ढवळून निघालेय. त्यांचे थोरले दीर नितीन पवार विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

आमदार गावीतांची दावेदारी राहणार. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांचे स्नेही एन. डी. गावीत उत्सुक आहेत. त्यांच्यापुढे भाजपने उमेदवारी डावलेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर यांचे आव्हान असेल.

आघाडीच्या राजकारणात चांदवड-देवळा आणि नांदगाव या जागा राष्ट्रवादी आपल्याकडे ठेवणार की काँग्रेसला देणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. डॉ. राहुल आहेर प्रबळ दावेदार असताना त्यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा चांदवड-देवळ्यात आहे. त्यांचे चुलत बंधू आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. जागा काँग्रेसला सुटली अथवा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवली, तरी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जाते. नांदगावमध्ये काँग्रेसचे माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सांकेतिक मानली जाते.

राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांच्या उमेदवारीसाठी येवला ही पसंती असेल. शिवसेनेकडून संभाजी पवार की रूपचंद भागवत हा प्रश्‍न आहे. निफाडमधून गतवेळी अनिल कदम यांचा निसटता विजय झाल्याने त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, असा पारंपरिक सामना रंगणार. मात्र, कदमांचे चुलत बंधू यतीन यांनी केलेली तयारी महत्त्वाची आहे. युतीच्या राजकारणात नांदगावच्या जागेबद्दलचा तिढा दिसतो. शिवसेनेच्या जागेवर भाजपच्या इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरवात केली आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
राष्ट्रवादी - छगन भुजबळ, माणिकराव शिंदे, नरहरी झिरवळ, पंकज भुजबळ, नितीन पवार, जयश्री पवार, डॉ. सयाजी गायकवाड, दिलीप बनकर, अमृता पवार.

शिवसेना - अनिल कदम, भास्कर गावीत, रामदास चारोस्कर, सुहास कांदे, संभाजी पवार, रूपचंद भागवत.

काँग्रेस - शिरीष कोतवाल, ॲड. अनिल आहेर, अश्‍विनी आहेर, माणिकराव बोरस्ते, यशवंत गवळी.

भाजप - डॉ. राहुल आहेर, केदा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मनीषा पवार, एन. डी. गावीत, समीर पवार, संजय पवार.

माकप - जे. पी. गावीत, इंद्रजित गावीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com