विधानसभेच्या सर्वच जागा जिंकण्यासाठी कामाला लागा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 June 2019

कार्यकर्ता हेच बळ - रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन्ही मतदारसंघांत जोमाने कार्य केले. कार्यकर्ता हेच पक्षाचे बळ आहे. त्यामुळे विधानसभेत जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे.

जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील होते. जिल्ह्यातील पक्षाचे खासदार व आमदार यावेळी उपस्थित होते. 

मंत्री महाजन म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. जिल्ह्यातील दोन्हीही जागा मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आल्या आहेत. मात्र, विधानसभेत हेच चित्र राहील, असा विश्‍वास ठेवू नका. विधानसभा निवडणुकीतील प्रश्‍न वेगळे आहेत. राज्यात सत्तेत आपण काय केले, यावरच जनता मतदान करणार आहे. गेल्या साडेचार वर्षांतील सत्तेच्या काळात राज्यात अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. त्यामुळे जनतेत समाधान आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी आता सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. जिल्ह्यात अकरा विधानसभा क्षेत्रांपैकी केवळ एक जागा विरोधी पक्षाकडे आहे. ती जागाही आता जिंकण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करावा.

भरपूर निधी दिला
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे मत व्यक्त करून मंत्री महाजन म्हणाले, की आता निवडणुकीसाठी केवळ तीन महिने उरले आहेत. त्यामुळे आता निधी येईल, या अपेक्षेवर राहू नका. आता कोणताही निधी मिळणार नाही. त्यामुळे जो निधी उपलब्ध झाला त्याची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेला द्यावी. आता कार्यकर्त्यांनी रडायचे नाही, तर लढायचे आहे. 

विधानसभेत यशासाठी सज्ज व्हा - उन्मेष पाटील
खासदार उन्मेष पाटील म्हणाले, की लोकसभेत पक्षाला कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले यश मिळाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेत यश मिळविण्यासाठीही सज्ज व्हावे. जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावा. 

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सुनील नेवे यांनी विधानसभेच्या तयारीची रूपरेषा सांगितली. पोपट भोळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार व भाजप नेते एकनाथराव खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, पक्षाचे माजी अध्यक्ष उदय वाघ, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, डॉ. के. डी. पाटील, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Girish Mahajan Politics