
नाशिक पूर्व हा भाजपचा ‘अ’ ग्रेडचा हक्काचा मतदारसंघ असल्याने पक्ष प्रतिमेचा लाभ घेत विधानसभेत जाण्यासाठी भाजपमध्ये डझनभर इच्छुकांत तीव्र चुरस आहे. आमदारकीपेक्षा पक्षाची उमेदवारी हेच प्रत्येक इच्छुकांचे ध्येय आहे. या ध्येयापर्यंत पोचण्यास बाळासाहेब सानप यांना रोखणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने भाजपच्या काही इच्छुकांनी ‘आमच्यापैकी कुणी द्या, पण बाळासाहेब नको’, अशा आणाभाका घेत ठरवून तयारी चालविली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत २४ हजारांवर मत मिळविलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि प्रभावी प्रचार सुरू असलेल्या मनसेची भूमिका येथे महत्त्वाची असणार आहे.
पूर्व मतदारसंघातील महापालिकेच्या पंचवटी आणि नाशिक रोड विभागातील ३६ पैकी सुमारे २९ प्रभागांत भाजपचा वरचष्मा आहे. महापालिकेपासून नुकत्याच झालेल्या लोकसभेपर्यंत भाजपचा प्रभाव दिसल्याने भाजप उमेदवारी देणार असेल तर ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, शहर सरचिटणीस सुनील आडके, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, सुनील केदार, डॉ. प्रा. तुळशीराम गुट्टे, हेमंत धात्रक, उत्तम उगले, कमलेश बोडके, गणेश गिते, दामोदर मानकर, दिनकर आढाव यांसह डझनभर नगरसेवक उमेदवारीसाठी तयार आहेत. याशिवाय सुनील बागूल, हिमगौरी आडके यांच्या नावाची मध्यसाठी चर्चा असली तरी पक्षादेश झाल्यास ते पूर्वमधूनही उमेदवारी करू शकतात.
सानप यांच्या ‘कला’
भाजप प्रवेशापासून गटनेता, सभागृह नेता, स्थायी समितीची उमेदवारी, उपमहापौर, महापौर, दोनदा विधानसभेची उमेदवारी, शहराध्यक्ष आणि आता भटक्या विमुक्त जाती-जमाती समितीचे प्रमुखपद मिळविताना भाजपमध्ये वारंवार पद कसे मिळवायचे, ही कला २० वर्षांत सानप यांनाच जास्त अवगत असल्याने अनेक इच्छुक मौनात आहेत. पण तरीही भाजप ११९ विद्यमान खासदारांची उमेदवारी रद्द करू शकतो, तर आमचा विचार का होणार नाही, या एका आशेवरील सात इच्छुकांनी आणाभाका घेत, ‘सानप सोडून आम्ही कुणी चालेल’, अशी ‘ठरवून’ मोर्चेबांधणी चालविली आहे. तर पाच इच्छुक अजूनही कुंपनावर आहे. ‘कॉन्ट्राव्हर्सी’ नको, आताच विकेट पाडू नका, पक्षाने दिले तर पाहू अशा प्रतिक्रिया देत शहराध्यक्ष सानप यांच्याशी पंगा नको म्हणून त्यांच्या सोयीच्या भूमिका मांडल्या.
मनसे-वंचित भूमिका महत्त्वाची
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ॲड. राहुल ढिकले दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. सद्यःस्थितीत ॲड. ढिकले हे एकमेव इच्छुक असावेत, की ज्यांचा सर्वाधिक तयारीने प्रचार सुरू असल्याचे दिसते. लोकसभा निवडणूक प्रचारात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार सभापासून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे या तिन्ही पक्षांची आघाडी गृहीत धरून मनसेची तयारी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने येथे पत्ते उघडलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सर्वाधिक मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात झाले.
तब्बल २४ हजारांहून अधिक मतदान मिळविल्याने आघाडीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि डॉ. संजय जाधव यांचे नाव चर्चेत आहेत. मात्र शिवसेनेप्रमाणेच वंचित आघाडीकडून इतर पक्षातील चांगला इच्छुक गळाला लावला जाऊ शकतो.
ट्विस्टवर भिस्त
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- मनसे आघाडी हे पूर्व मतदारसंघात गृहीत धरले जात असले तरी ऐनवेळी काही बिघाडी झाल्यास उमेदवार असावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, विजय आव्हाड, गौरव गोवर्धने प्रयत्नशील आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून विजय राऊत आणि अशोक खलाणे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेना- भाजपची युती असल्याने शिवसेनेच्या गोटात शांतता आहे. ऐनवेळी युतीत बिघाड झाल्यास किंवा नांदगाव मतदारसंघासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आग्रहावरून पूर्व व नांदगाव मतदारसंघात अदलाबदल झाल्यास शिवसेनेकडून नाशिक रोड- देवळाली व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, राजेंद्र लवटे किंवा मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्यापैकी एकाला लॉटरी लागू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.