esakal | डोंगरासहित भूखंड बळकावण्याचा संगनमताने डाव; विक्रीकडे तलाठ्यापासून तहसीलदारांचेही दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

The villagers are furious when they realize that Sabargad natural hills have also been sold

येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर खुणा गाडण्याची प्रक्रिया सुरू करणे हा केवळ योगायोग नसून ग्रामपंचायत कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. म्हणजेच प्रशासक नियुक्तीच्या गडबडीत सबरगड विक्रीचा डाव खेळल्यास कोणाचे लक्ष जाणार नाही हा हेतू यामागे होता, असे दिसते. 

डोंगरासहित भूखंड बळकावण्याचा संगनमताने डाव; विक्रीकडे तलाठ्यापासून तहसीलदारांचेही दुर्लक्ष

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : येथील सबरगड डोंगर विक्री प्रकरणी मिळालेल्या काही कागदपत्रांवरून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येत असून ६५, ६६ व ६७ असे तीन गट एकत्र करून संगनमताने भूखंड बळकावण्याचा महाभागांचा डाव होता. त्यात सबरगड नैसर्गिक डोंगरही विक्री करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थ भडकले आहेत. या प्रकरणी तलाठ्यापासून तहसीलदारांपर्यंत सर्वांचे दुर्लक्ष झाले. हा अक्षम्य प्रकार पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.
 
येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर खुणा गाडण्याची प्रक्रिया सुरू करणे हा केवळ योगायोग नसून ग्रामपंचायत कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. म्हणजेच प्रशासक नियुक्तीच्या गडबडीत सबरगड विक्रीचा डाव खेळल्यास कोणाचे लक्ष जाणार नाही हा हेतू यामागे होता, असे दिसते. 

हक्क आणि कब्जा 

जुन्या ‘ड’ पत्रकाच्या आधारावर नंदुरबार येथील काही महाभागांनी येथील १०.८९ हेक्टर क्षेत्र काबीज केले. त्याजागी आता वस्ती असल्याने त्यांनी जागा बदलून खुणा गाडल्या. मात्र, एखाद्याच्या नावावर जागा असली तर त्या जागेचा हक्क त्याला प्राप्त होतो. मात्र, वर्षानुवर्षे त्यांच्याकडे जागेचा कब्जा नाही. तसेच त्यांचा वहिवाट व उपभोग नसल्याने १९७० मध्येच त्या जागेचे रूपांतर गावठाण जागेत झाले. त्यामुळे सातबाऱ्यावर त्यांचे नाव असले तरी अनेक वर्षांपासून त्यांचा कब्जा, वहिवाट व उपभोग नसल्याने त्यांना ती देता येत नाही, हा नियम सरकारी यंत्रणाच सांगते. ग्रामपंचायतीकडून तसे कागद मिळविण्यासाठी सजग युवक प्रयत्नशील आहेत. याशिवाय ते ‘ड’ पत्रक खरे आहे का, याबाबत ग्रामस्थ शंका उपस्थित करीत आहेत. 

ग्रामस्थांनी जागरूक राहावे 

गावातील अतिक्रमणांमुळे गावठाण संपण्याच्या मार्गावर आहे. नवीन विकासकामासाठी जागाच नाही, अशी स्थिती आहे. काही आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य गावातील विकासकामांचा ठेका घेतात हे सर्वज्ञात आहे, पण कागदोपत्री तशी नोंद नसते. त्यामुळे कामे चांगली होतील ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे. आता अशीच काही ठेकेदार मंडळी पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहण्यास इच्छुक असून, ग्रामस्थांनी जागरूक राहणे, जातीपातीच्या राजकारणात न अडकता योग्य उमेदवाराच्या पाठीशी राहणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मांडतात.

संपादन - सुस्मिता वडतिले