Dhule Crime : ‘शतक’ पूर्ण करण्याचा चोरट्याचा बेत फसला; ग्रामस्थांनी पकडले रंगेहाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Update

Dhule Crime : ‘शतक’ पूर्ण करण्याचा चोरट्याचा बेत फसला; ग्रामस्थांनी पकडले रंगेहाथ

म्हसदी (जि. धुळे) : म्हसदीसह परिसरात दोन वर्षांपासून चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. भरवस्तीत घरे, दुकाने आणि शेतशिवारातील वीजपंपासह तत्सम साहित्यावर चोरटे डल्ला मारत धाडस करत आहेत. सतत चोरीच्या घटना वाढत असल्याने ठराविक जागृत ग्रामस्थ रात्रीची गस्त घालत होते. शिवाय बसस्थानक परिसरातील दुकानदार दररोज सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नजर ठेवून होते.रविवारी मध्यरात्री दुकानदारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती वेगवेगळी हालचाल करत आढळली.

ग्रामस्थ, युवकांनी संपर्क केल्यावर कृषी सेवा केंद्राचे दुकान तोडताना रंगेहाथ पकडत चोरटा पोलिसांच्या ताब्यात दिला. दरवेळेस पोलिसांच्या हातावर ‘तुरी’ देणाऱ्या चोरट्यास चक्क ग्रामस्थांनीच पोलिसांच्या स्वाधीन केले. आता पोलिस प्रशासन काय कारवाई करेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. यापूर्वी तब्बल ९८ वेळा चोरीच्या घटना झाल्या असून, शतक पूर्ण करण्याचा चोरट्याचा बेत फसला, अशी खोचक प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. (Villagers caught Thief red handed Dhule Crime news)

हेही वाचा: Nashik Crime: आरक्षित रेल्वे तिकीटांचा मोठा घोटाळा; १६ हजारांच्या तिकिटांसह तरुणाला अटक

म्हसदी येथे घरे, किरणा दुकान, मेडिकल, चप्पल दुकान, सायकल-दुचाकी दुरुस्तीचे दुकान, सिमेंट विक्रीचे दुकान, बी-बियाणे, रासायनिक खतांच्या दुकानावंरही चोरट्यांची वक्रदृष्टी पडत आहे. रविवारी रात्री कैलास पोपटराव देवरे यांच्या पार्वती कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे कुलूप तोडताना बसस्थानक परिसरातील दुकानदार, ग्रामस्थ, धाडसी युवकांनी चोरट्याला पकडण्यात यश मिळविले.

पोलिस केव्हा चोर पकडतील आणि गावाला भयमुक्त करतील याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा‌ करणाऱ्या ग्रामस्थ, व्यावसायिक आणि युवकांनी धाडस दाखवत चोरट्याला जेरबंद केले. संशियत चोरटा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वेळा त्याला शिक्षा झाली आहे. ग्रामस्थांनी चोरट्यास हवालदार भिकन कदम, अनिल जाधव, म्हसदीचे प्रभारी पोलिसपाटील रवींद्र बेडसे व इतर पोलिस कर्मचारी यांच्या स्वाधीन केले.

पोलिसांच्या भूमिकेविषयी उत्सुकता..!

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकान फोडत चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दिली जाते. पोलिस प्रत्येक वेळी पंचनामा होतो, पण चोरटे हाती लागत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. पहाटे चक्क धाडसी आणि जागरूक ग्रामस्थांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले. आता पोलिस काय कारवाई करतात ही ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : आजीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांसमोर आव्हान