पोलिसांनी जिवंत नेला अन्‌ रुग्णालयात मृतदेह भेटला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

मुक्ताईनगर पोलिसांनी सुनील तारू यांना शनिवार (ता.29) रोजी शेतात काम करत असताना परस्पर अटक केली. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांना रवाना केले होते. बुधवार (ता.3) रोजी भुसावळ कारागृहात असताना प्रकृती चिंताजनक झाल्याने सुनील तारू यांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात "अनकॉन्शस' असल्याने दुसऱ्याच दिवशी गुरुवार(ता.4) रोजी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर राहता आले नाही. कामकाज होऊन न्यायालयाने याच गुन्ह्यात सुनील तारू यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

जळगाव,ता. 8 : - काकाने दाखल केलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात सुनील भागवत तारू (40, रा.चांगदेव, मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर पोलिसांनी वॉरंटमध्ये शनिवार(ता.29) रोजी अटक केली होती. तद्‌नंतर न्यायालयात हजर केल्यावर सुनील तारू यांना न्यायालयीन कोठडीत भुसावळ कारागृहात रवाना करण्यात आले. आणि कुटुंबीय जामिनासाठी हिंडत असतानाच प्रकृती खालावल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्याची माहिती कळाल्याने ते रुग्णालयात धडकले. अत्यवस्थ पतीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण बघितल्यावर कुटुंबीयांनी तेव्हाच आरोप केले होते.मात्र, अतिरिक्त उपचारासाठी त्यांना धुळे शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले, तेथे शनिवार(ता.7) रोजी मृत्यू झाल्याने रात्री10 वाजता मृतदेह जळगाव आणण्यात आला असून तेव्हा पासून वृद्ध आईवडील, 3 अपत्ये आणि पत्नी तक्रारदार काका-काकूसह अटक करणाऱ्या पोलिसांना अटकेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करून आहेत. 

सुनील तारू या शेतमजूर गृहस्था सख्खा काका कडू जगन्नाथ तारू याने वडिलोपार्जित घराची जागा बळकावून न्यायालयात स्वतंत्र खटला दाखल केला होता. भुसावळ न्यायालयात संशयित म्हणून सुनील तारू तारखांना हजर राहत नाही म्हणून न्यायालयाने अटक वॉरंटची बजावणी केली होती. मुक्ताईनगर पोलिसांनी तारू यांना शनिवार (ता.29) रोजी शेतात काम करत असताना परस्पर अटक केली. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांना रवाना केले होते. बुधवार (ता.3) रोजी भुसावळ कारागृहात असताना प्रकृती चिंताजनक झाल्याने सुनील तारू यांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात "अनकॉन्शस' असल्याने दुसऱ्याच दिवशी गुरुवार(ता.4) रोजी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर राहता आले नाही. कामकाज होऊन न्यायालयाने याच गुन्ह्यात सुनील तारू यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

पोलिस अधीक्षकांना तक्रार 
मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर काका कडू जगन्नाथ तारू यांच्या सांगण्यावरून सुनीलला अमानुष मारहाण केल्याचा आरोप वृद्ध आई गुंफाबाई यांनी केला आहे, पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सुनील यांच्या पाठीवर गंभीर व्रण पडले असून मारहाणीमुळेच त्याची प्रकृती खालावली. यापूर्वीदेखील कडू यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी मारहाण केली होती, असे नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे. 

ठिय्या-आत्मदहनाचा इशारा 
धुळे वैद्यकीय महाविद्यालयात सुनील तारू यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवार (ता.7)रोजी रात्री 8:10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृतदेह जळगावी आणल्यावर रात्री 10:30 पासून कुटुंबीयांनी सिव्हीलच्या शवविच्छेदनगृहा बाहेर ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, नातेवाईक कुटुंबीयांची गर्दी वाढत जाऊन जिल्हारुग्णालया बाहेरील मुख्य रस्त्यावर नातेवाइकांनी रास्तारोको आंदोलन करून संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, तक्रारदार काका कडू जगन्नाथ तारू, काकू सोनीबाई, आत्या लीलाबाई, धनू कोळी यांच्यासह वॉंरटवर अटक करून नेणाऱ्या पोलिसांना खुनाच्या गुन्ह्यात आताच्या आता अटक करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा पत्नी मंगलाबाई, बहीण अनीता सूर्यवंशी यांच्यासह नातेवाइकांनी दिली. सुनील तारू यांच्या पश्‍चात मुलगी मोनाली (वय-13), भावना(वय-11) मुलगा यश (वय-8) यांच्या आई-वडील पत्नी असा परिवार असून गेल्या चोवीस तासांपासून हे कुटुंबीय अन्न पाण्याविना सिव्हिल मध्ये थांबून होते. 

न्यायालय आले सिव्हिल मध्ये 
कुटुंबीय नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्यावर, जिल्हा रुग्णालयात निरीक्षक अकबर पटेल यांनी कुटुंबीयांची समजूत घालण्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आटोकाट प्रयत्न चालवले होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या पोलिसांनी तातडीने मॅजिस्ट्रेट निवासस्थान गाठून घटनेचे गांभीर्यपूर्वक माहिती दिल्यावर न्या. डी.बी.साठे यांनी शवविच्छेदनगृहात येऊन मृतदेहाची पहाणी केल्यावर पुढील कारवाई बाबत पोलिसांना सूचना केल्या. वैद्यकीय समिती समक्ष शवविच्छेदन झाल्यानंतरही रात्री आठ वाजेपर्यंत नातेवाइकांनी प्रेत ताब्यात घेतले नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह जिल्हारुग्णालयात टाकून नातेवाईक घरोघरी निघून गेले असून मागण्या मान्य झाल्या शिवाय माघार न घेण्याचा ठाम निर्णय रात्री उशिरा कुटुंबीयांनी पोलिसांना कळवला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warrent accused deth in custody at jalgaon