Dhule : दोंडाईचा परिसरातील 12 गावांना पाणीटंचाई | Lates Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water crisis news

Dhule : दोंडाईचा परिसरातील 12 गावांना पाणीटंचाई

धुळे : पावसाळ्याचे तीन महिने लोटल्यानंतर एकीकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना दोंडाईचा परिसरातील जवळपास १२ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कर्ले (ता. शिंदखेडा) गावाला तर चक्क आजूबाजूच्या पाच विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यानंतरही गावाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर काय स्थिती राहील याची ग्रामपंचायतीला चिंता आहे. (Water shortage in 12 villages of Dondai Dhule Latest Marathi News)

कर्ले, परसुळे, मांडळ, विखरण, चुडाणे, खर्दे, अंजनविहीरे, चौगांव बु., चौगांव खु, सोनशेलू, सुराय, वरझडी आदी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना अद्यापही पाणी आलेले नाही. या गावांमध्ये सलग दोन वर्षापासून अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

दरम्यान, अशातच ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत विहीर बंद करण्यात यावे अशा आशयाचे पत्र तहसीलदारांनी दिल्याने चिंतेत भर पडली आहे. कर्ले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या वर एक पाझर तलाव असून, त्यात गेल्या वर्षी एक थेंबही पाणी आले नाही. यावर्षीदेखील आता पावसाळ्याचे तीन महिने लोटल्यानंतरदेखील त्यात जलसाठा नाही. त्यामुळे विहिरींना पाणी येण्याचा प्रश्नच येत नाही.

या ठिकाणी जून, जुलै, ऑगस्टमध्ये रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे ते पाणी केवळ जमिनीत मुरले. शासन दरबारी पावसाची जी नोंद होते त्यात सर्कलनिहाय पाऊस मोजला जातो. मात्र शेवाडे सर्कलमध्ये कर्ले, परसुळे या गावांना इतर गावांप्रमाणे पावसाचे प्रमाण नसताना देखील शासन दरबारी चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण बंद करण्याबाबत तहसीलदारांकडून आदेश आले असावेत. प्रत्यक्षात गावात वेगळे चित्र आहे.

हेही वाचा: 2 वर्षांनंतर गजबजणार भालेकर मैदान; गणेशोत्सव मंडळांकडून तयारी अंतिम टप्प्यात

बुराईतून तलाव भरा

पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या बुराई नदीच्या पाण्यातून सतारे, कर्ले, चुडाणे, सुराय, आदी गावांना लाभ होण्यासाठी सतमाने येथील बुराई नदीतून एक्सप्रेस कॅनाल किंवा नैसर्गिक उताराने एक-दीड कोटीचा निधी खर्च केल्यास पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. त्यासाठी कर्ले ग्रामपंचायतीने ठरावही केला असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

पाटचारी करावी

वाडी-शेवाडी धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरत असते. उर्वरित पाणी बुराई नदीद्वारे तापी नदीद्वारे समुद्राला मिळते. देगांव गावाजवळ पाटचारी केल्यास तेथेदेखील नैसर्गिक उताराने अंजनविहीरे, खर्दे ,मांडळ, दोंडाईचा मंदाणे आदी गावांना कायमस्वरूपी लाभ होऊ शकतो अशी या गावांची मागणी असून, लवकरच तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा प्रयत्न संबंधित ग्रामस्थांचा आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणेशभक्तांसाठी यंदाही ‘SAKAL’तर्फे अनोखी स्पर्धा

Web Title: Water Shortage In 12 Villages Of Dondai Dhule Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..