धुळे : आयशरच्या धडकेत महिला जागीच ठार

accident
accident

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून दिलेल्या जोरदार धडकेत आयशरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार येडबाई मनराज पाटील (वय-52) रा.टिटाणे ता.साक्री ह्या जागीच ठार झाल्या. तर दुचाकीचालक भय्या मनराज पाटील (वय-37) हे किरकोळ जखमी झाले. ते दोघेही साक्रीहून त्यांच्या टिटाणे गावी जात होते.

जखमी भय्या पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर चालक हरिभाऊ गोविंद हजारे, रा.सोन्या मारुती मंदिराजवळ, सुरतवाला बिल्डिंग, धुळे याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आयशर चालक नंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने निजामपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पाटील घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

अपघात एवढा जबरदस्त होता की, मयत येडबाई पाटील यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी कवटीची हाडे व मेंदूसह रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर चालकाने तेथून पळ काढला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसह बघ्यांनी यावेळी एकच गर्दी केली होती. निजामपूर पोलिसांसह काही उपस्थितांनी मयतासह जखमीस जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना महाले यांनी तपासणीनंतर येडबाई पाटील यांना मृत घोषित केले. जखमी भय्या पाटील यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास मयत येडबाई पाटील यांच्यावर टिटाणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मयताचे पती मनराज पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांच्यामागे पतीसह, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मयताच्या कुटुंबियांना भरीव शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते भिकन बागुल यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह चौपदरीकरणाचा मुद्दा चव्हाट्यावर!
गेल्या पाच पर्षांपासून मंजूर झालेल्या नेत्रांग ते शेवाळी फाटा या 108 किलोमीटरच्या (753-बी) राष्ट्रीय महामार्गाचे नंदुरबार ते शेवाळी फाट्यापर्यंत सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर महामार्ग रुंदीकरणासह चौपदरीकरणाचे काम शासकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आगामी काळात शासकीय, प्रशासकीय यंत्रणा अजून किती बळी जाण्याची वाट पाहते? हाच खरा यक्षप्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com