
World Theatre Day : सातपुड्यातील प्रवीण भारतीचा कलाजगतात ठसा! रांझणीचे नाव केले उज्ज्वल
तळोदा (जि. नंदुरबार) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रांझणी (ता. तळोदा) या छोट्याशा खेड्यातील प्रवीण भारती यांनी रंगमंचाच्या माध्यमातून आपली कला सादर करून, रांझणी पर्यायाने तळोद्याच्या नावलौकिकात भर घातली आहे.
वास्तविक कला क्षेत्राशी कोणताही कौटुंबिक वारसा नसताना या ग्रामीण कलावंताने केवळ आपल्या अंगी असलेल्या जिद्द, मेहनत व चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर लेखन, दिग्दर्शन व अभिनय अशा तिहेरी भूमिकेतून कलाजगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (World Theater Day Praveen Bharti mark in world of art from Satpuda nandurbar news)
प्रवीण भारती यांना बालपणापासूनच कलेची आवड होती. तळोद्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्नेहसंमेलनात विविध कलावंतांच्या मिमिक्री सादर करून तसेच एकांकिका लिखाण, दिग्दर्शन व स्वतः अभिनय करून त्यांनी नाट्यप्रवासाला सुरवात केली.
महाविद्यालयीन जीवनात त्यांची ‘किसी का जुता किसी के सर’, किरण बैसाणे लिखित ‘कयामत से हजामत तक’ व ‘आयडिया फेल’ या एकांकिका विशेष गाजल्या. याचदरम्यान आकाशवाणी जळगाव केंद्रावरून युववाणी व ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी असलेल्या लोकजागर कार्यक्रमातून त्यांनी सादर केलेले कार्यक्रम त्या काळी घराघरांत पोचले.
त्यात अहिराणी कार्यक्रम ‘सासूना कुडापा’, ‘सकून लगीन’ यांचे कथा अभिवाचन, तर ‘माले बी शायामा जावान शे’ ही नाटिका श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. नव्वदच्या दशकात त्यांनी ग्रामीण भागात नाटिका सादर केल्या, या वेळी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे त्यांचे ‘गोड उसनी कडू कहानी’ हे नाटक पंचक्रोशीत विशेष गाजले होते.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयामार्फत १९९५ मध्ये त्यांची नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात बालनाट्य प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली. ख्यातनाम नाटककार प्रभाकर आंबोणे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नाट्य प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेते डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, जयंत सावरकर अशा दिग्गज कलावंतांचा सहवास त्यांना लाभला.
पुढे २००० मध्ये मुंबई येथे जाऊन अविनाश कुलकर्णी निर्मित, दिग्दर्शित तसेच अभिनेते अशोक शिंदे व अर्चना नेवरेकर अभिनीत तिसरा डोळा, आकांक्षा मालिकेत त्यांना अभिनयाची संधी मिळाली.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
दरम्यान, आई-वडिलांचे सेवा कर्तव्य व कौटुंबिक जबाबदारी प्रवीण भारती यांच्यावर आल्याने मुंबईहून त्यांना मूळगावी परतावे लागले. गावाकडे आल्यावरही त्यांनी आकाशवाणी धुळे केंद्रावरून ‘पिंपळपार’ व ‘घरदार’ या कार्यक्रमाचे लेखन व सहभाग अशा दुहेरी भूमिका सांभाळत कलाप्रवास सुरूच ठेवला आहे.
अशोक शिंदे यांना मानतात आदर्श
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अशोक शिंदे यांना प्रवीण भारती आपल्या कला व व्यक्तिगत जीवनात आदर्श मानतात.
विशेष म्हणजे याच महिन्यात प्रवीण भारती यांच्या वाढदिवशी अशोक शिंदे यांनी स्वाभिमान मालिकेच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून स्वतः फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ही आपल्यासाठी खूप मोठी व अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रवीण भारती यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.