मुक्त विद्यापीठाचा सावळा गोंधळ; प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

''मी अंगणवाडी सेविका असून, आमचे प्रशिक्षण आटोपून मी प्रवेशपत्रावरील पत्त्यानुसार परीक्षेसाठी दिंडोरी येथे गेले होते. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्र वणी असून, तेथे परीक्षेसाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला''. 

 - आशा थोरमिसे, परीक्षार्थी.

वणी (नाशिक) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आज (ता. १५) पासून सुरु झालेल्या पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता देण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेसाठी वेळेत पोहचू शकले नाही. परिणामी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. 

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आज   पदवी परीक्षा सुरु झाल्या आहेत.  या परिक्षार्थींना वितरीत करण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय, मेन रोड, दिंडोरी असा पत्ता देण्यात आला. प्रत्यक्षात सदर महाविद्यालय हे दिंडोरी गावापासून ५ कि.मी. अंतरावर गावाबाहेर आहे. येथे जाण्यासाठी भाड्याचे वाहन अवाजवी पैसे मागत असल्यामुळे परीक्षार्थी पायी गेले. तेथे पोहचल्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षा ही २० किमी अंतरावर वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेस वेळेवर पोहचू न शकल्याने वंचित राहिले.

काही विद्यार्थी वणी येथील परीक्षा केंद्रावर घाई गर्दी करीत उशिरा पोहचले. यावेळी पालकांनी याबाबत केंद्र समन्वयकांना जाब विचारत विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप व होणारे नुकसान निदर्शनास आणून दिल्यावर समन्वयक प्रा. प्रविण कांबळे यांनी उशिरा पोहचलेल्या विद्यार्थ्यांना उशीरापर्यंत वेळ वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यापीठाच्या चूकीमळे सर्वसाधारण वीस ते पंचवीस विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले असल्याची माहिती आहे.
             
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा पत्ता विद्यापीठाकडून चुकीचा छापून आला आहेे. याबाबत शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्रामार्फत कळविण्यात आले होते. मात्र, संपर्क नसलेले विद्यार्थी हे दिंडोरीला परीक्षेस गेल्याने त्यांना वणी केंद्रात पोहचण्यास उशीर झाला. त्यांंना परीक्षेस बसवण्यास परवानगी देण्यात आली असून, विद्यापीठास प्रवेश पत्रातील चूक निदर्शनास आणून दिली आहे.

- प्रा. प्रविण कांबळे, केंद्र समन्वयक वणी महाविद्यालय.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong Address on Admit Card of Examination Center