तळीरामांच्या आनंदाला उधाण;वाईन शॉपला सशर्त परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

फिजिकल डिस्टन्सींग चे पालन आणि नियमांना आधीन राहून मद्य विक्री करता येणार असल्याने पंच्चेचाळीस दिवसांचा ड्राय-डे पाळणाऱ्या तळीरामांच्या आनंदाला उधाण आले आहे.

जळगाव :- शहरात आणि जिल्ह्यात 21 मार्च पासून इतर आस्थापना प्रमाणेच हॉटेल-बिअरबार आणि वाइन शॉप बंद होते. लॉकडाऊचे तिसरे पर्व आज पासून सुरू झाले असून राज्य शासनाच्या निर्देशा नुसार जिल्ह्यातील वाइन शॉप सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. फिजिकल डिस्टन्सींग चे पालन आणि नियमांना आधीन राहून मद्य विक्री करता येणार असल्याने पंच्चेचाळीस दिवसांचा ड्राय-डे पाळणाऱ्या तळीरामांच्या आनंदाला उधाण आले आहे. 

नोव्हेल कोरोना विषाणूंच्या संक्रमणाने संपूर्ण देशाचे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून उद्योग, व्यवसाया सहित सर्वच आस्थापना बंद होत्या. देशपातळीवरील लॉकडाऊन लागण्याच्या एक दिवसा अगोदरच महाराष्ट्रात जनता कर्फ्युने लॉकडाऊनची सुरवात झाली. परिणामी, दारुसह इतर व्यसने असणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. राज्यशासनाने कोरोना प्रभावात असलेल्या जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन विभागून दिले होते. त्यात ग्रीन झोन मध्ये बऱ्यापैकी आस्थापना सुरू करण्याचे आदेश करण्यात आले. राज्य शासनाचा महसूल बुडवून गैर मार्गाने जिल्ह्यासह राज्यात मद्य विक्री सुरू होती. जळगावच्या आर.के.वाइन प्रकरणातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावलेले सील तोडून मद्याची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले. पंच्चेचाळीस दिवसांचा भला मोठा "ड्राय-डे' पूर्ण होऊन आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वाईनशॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. 

फिजिकल डिस्टन्सींगचे पालन 
जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची माहिती दिली. वाइन शॉप उघडण्यासाठी होकार देताच अवघ्या काही मिनिटातच वाइन शॉप मालकांनी आपल्या दुकाना समोर चक्क पांढरे पट्टे आणि बॅरीकेट्‌स्‌ उभे करून दुकान उघडण्याची तयारी करीत असल्याचे दिसून आले. फिजिकल डीस्टन्सींग चे पालन हीच मोठी अट राहणार आहे, गरज पडल्यास विक्रेत्यांना पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wwaine shop open today in jalgaon