Corona Impact: 'रोजची भाकरी मिळणेही झालं अवघड'; बासरी विक्रेत्याची खंत

रमेश पाटील
Sunday, 3 January 2021

दरवर्षी यात्रेचे शेकडोंच्या संख्येने होणारी बासरीची विक्री  यावर्षी यात्रोत्सव रद्द झाल्याने अल्पशी ठरली आहे. त्यामुळे या वर्षाची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने बासरी विक्रेत्यांना चिंतेने ग्रासले नसल्यास नवल नाही.

सारंगखेड : येथील बाजारपट्यात बासरीचा सुमधुर आवाज मानसिक तणाव जरूर कमी करीत आहे. परंतु याच आवाजाचे गुंजन विक्रेत्याला बासरीचे ग्राहक आकर्षित करण्यास कमी पडत आहेत. दरवर्षी यात्रेचे शेकडोंच्या संख्येने होणारी बासरीची विक्री  यावर्षी यात्रोत्सव रद्द झाल्याने अल्पशी ठरली आहे. त्यामुळे या वर्षाची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने बासरी विक्रेत्यांना चिंतेने ग्रासले नसल्यास नवल नाही. बासरीतून सुंदर स्वर बाहेर पडत असले तरी हे सुंदर स्वर यावेळी दररोजच्या भाकरीचीही सोय करू शकत नाही. कारण त्यासाठी बासरींची विक्री होणे आवश्यक आहे. यावर्षी यात्रोत्सव नसल्यामुळे मंदिराच्या खाली  ग्राहकांचा शोधात बासरी विक्रेता फिरत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पुरे सूर तो नही आते, फिर भी कोशिश तो करनी पडती है। सूर मे जिंदगी जिनेकी खोज है, बांसूरी के सूर से हमारा जीवन जुडा हुआ है ।  बासुरीच्या सुरात जीवन जगण्याची आशा बाळगणारा महंमद अन्सारी (वय ४५) हा मूळचा बिहार राज्यातील पैगंबपूर या गावचा आहे. बासरी विक्रीसाठी तो सध्या येथे आला आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने बासरी घेण्यासाठी ग्राहक सापडत नाहीत. दरवर्षी यात्रेत शेकडोंच्या संख्येने होणारी बासरीची विक्री यावर्षी अल्पशी झाली असल्याने पुढील अर्थाजनाची चिंता त्याला सतावीत आहे. मंदिराभोवती चौकाचौकांमध्ये बासरीतून सुंदर व सुमधुर स्वर बाहेर पडत असले तरी हे स्वर भाकरीची एकवेळही भागवत नाहीत. त्याकरीता बासरींची विक्री होणे आवश्यक आहे. या बासरी विक्रेत्याला शोध आहे तो ग्राहकाचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप

आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असे एकत्र कुटुंब याच व्यवसायावर जगत आहे. परंपरागत सुरु असलेल्या या उद्योगावर संपूर्ण गाव जगते. वाडवडीलांपासून देशभरातील लहान, मोठया यात्रोत्सावात जाऊन बासरी विक्रीचा व्यवसाय करुन उपजिविका चालत आली आहे. मात्र गत आठ महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते म्हणून आलो. मात्र यात्रा नसल्याने ग्राहक मिळत नाही.

कशी बनवतात बासरी..

बासरीचे खरे सूर 'जिभा' यावरच अवलंबून असते. यासाठी 'राहर' जातीच्या हलक्या वजनाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. जिभा बनविताना कौशल्य पणाला लागते. बासरीतून अधिक सुरेल सूर येण्यासाठी ती तयार झाल्यावर तिला काळया मातीचा लेप देऊन शेकगीवर भाजण्यात येते. भाजल्यानंतर परत तिची सफाई करण्यात येते. बासरी तयार झाल्यावर तिला पॉलिश मारण्यात येते. भाजल्यानंतर तिच्यावर काळे तपकीरी वलय पडतात. त्यात वॉर्निश पॉलिश दिल्यानंतर ती अधिकच सुंदर दिसते.

पडताळणी करूनच खरेदी

हौशी व शिकावू ग्राहक बासरी व्यवस्थित पाहूनच खरेदी करतात. एका बासरीच्या खरेदीसाठी चार, पाच बासरींच्या सुरांची पडताळणी करतात व ते योग्यच आहे. बासरीची किमंत तिच्या लांबीवर अवलंबून असते. वीस रुपयांपासून दिडशे रुपयांपर्यंत त्यांच्या किमंत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year the flute seller is looking for customers as there is no pilgrimage due to corona