धुळे : सोनगीरच्या तरुणांची ढाबा व्यवसायात उभारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swagat Hotel Dhule

धुळे : सोनगीरच्या तरुणांची ढाबा व्यवसायात उभारी

सोनगीर (जि. धुळे) : येथील ढाबे (Dhaba) व त्याअनुषंगाने सुरू असलेले विविध व्यवसाय एक छोटी औद्योगिक वसाहत होऊ पाहत आहे. येथील सुमारे दोन हजार लोकांचा उदरनिर्वाह ढाब्यांवर अवलंबून आहे. सोनगीर व ढाबे हे समीकरण विस्तारित होत असून, मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग ढाबे व्यवसायात उतरले आहेत. कोणताही राजकीय वरदहस्त नसताना, विविध विकासकामांबाबत नेहमीच डावललेल्या गावाने ढाबे व्यवसायात भरारी घेतली आहे. (youth of Songir have been raised in Dhaba business Dhule News)

सोनगीरपासून दहा किलोमीटर अंतरापर्यंत नरडाण्याकडे व पाच किलोमीटर अंतर देवभाने व तीन किलोमीटरवर सोंडलेपर्यंत ढाबे पसरले आहेत. मुंबई-आग्रा महामार्ग व सोनगीर - खेतिया राज्यमार्ग मिळतात. ढाबे, उपाहारगृहे व अन्य पन्नासहून अधिक दुकानांची दाटी झाली आहे. ढाबे व्यवसायावर गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. जवळच पेट्रोल पंप आहे. ढाबे, पेट्रोल पंप, उपाहारगृहे, पान दुकान, गॅरेज व अन्य व्यवसायांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा: मालकाने बांधले चक्क गायीचे मंदिर

तरूणांनी ढाबा व्यवसाय केला हायटेक

नरडाणा, दोंडाईचा, मोराणे, आर्वी, सोंडले शिवारात व्यवसाय करताना येथील ढाबेचालकांनी जिल्हाबाहेरही चव नेली आहे. नंदूरबार, अक्कलकुवा, जळगाव, भिवंडी येथेही ढाबे सुरू केले. मात्र फलकावर सोनगीरकरांचे ढाबे असाच उल्लेख केला. ढाबे व्यवसायात अनेक तरुणांनी उडी घेतली असून, संगणकाच्या साहाय्याने हायटेक व्यवसायाकडे ढाबे मार्गक्रमण करीत आहे.

हेही वाचा: Dhule : भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी ओढाताण

संख्या दुप्पट, दररोज दोन क्विंटल शेव फस्त

मुंबई आग्रा महामार्गालगत परिसरात ढाब्यांची संख्या गेल्या दोन वर्षात दुप्पट झाली आहे. सोनगीर अंकलेश्वर राज्यमार्गावरील वाहतूक वाढल्याने परिसरात त्यामार्गावर ढाब्यांची संख्या वाढत आहे. गावरानी भाकरी व ठेचासह शाकाहारी, मांसाहारी जेवणात अनेक प्रकार उपलब्ध असले तरी शेवभाजीची लज्जत कायम आहे. क्वालिटी सोबत क्वांटिटीचा विशेष विचार केला आहे. इतरत्र जेवणासाठी लागणारा खर्चापेक्षा कितीतरी कमी किमतीत जेवण होते. येथील शेवभाजी सर्वात लोकप्रिय असून दररोज सर्व ढाब्यांवर मिळून दोन क्विंटल शेव फस्त होते.

"ढाब्यांवरील चवीच्या ओढीने वाहनचालक खास जेवणासाठी सोनगीरमध्ये थांबतात. ग्राहक कमी किमतीत लज्जतदार जेवणची चव चाखतात त्यातच आम्ही समाधान मानतो." - मोतीलाल माळी, संचालक, हॉटेल स्वागत

"सोनगीरचे ढाबे आणि शेवभाजी यांचे घट्ट नाते असून, दहापैकी पाच ग्राहक शेवभाजीची मागणी करतात. ढाब्यांनी शेकडो बेरोजगारांना काम दिले आहे." - संदीप वाघ, सह भागीदार हॉटेल सुवर्णनगरी

"महामार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर ढाबे सुरू होतात. व काही दिवसांनी बंदही पडतात. मात्र येथील ढाबेचालकांनी टिकवून ठेवलेल्या चवीमुळे व्यवसायात भरभराट होत असून, अनेक तरुण या व्यवसायात भरारी घेत आहेत." - आर. के. माळी, संचालक, हॉटेल आशीर्वाद

Web Title: Youth Of Songir Have Been Raised In Dhaba Business Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DhuleBusiness
go to top