Dhule : भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी ओढाताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Crisis in Dhule

Dhule : भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी ओढाताण

धुळे : तापी (Tapi River) योजनेवरील दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी शहरातील काही भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी कसरत (Water Crisis) पाहायला मिळत आहे. काही भागात त्या-त्या भागातील नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्ते महापालिकेचा अग्निशमन बंब (Firefighter) मागवून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न करत आहेत. (People of dhule get water from firefighters in Scorching Summer Dhule water Crisis News)

शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेवरील गळत्यांची दुरुस्ती, बाभळे जलशुद्धीकरण (Water purification) केंद्रातील गाळ काढणे व शहरातील इतर काही ठिकाणच्या गळत्या, व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे अशा एकत्रित कामासाठी ६ मेस तापी योजनेचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे शहराचा संपूर्ण भाग, बडगुजर जलकुंभ, मायक्रो टॉवर, दसेरा मैदान, चक्करबर्डी, मोहाडी, नाटेश्‍वर, जामचा मळा आदी जलकुंभावरून एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. नियोजनानुसार गळत्यांची दुरुस्ती व जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम संपल्यानंतर शनिवारी (ता.७) सकाळी दहाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. असे असले तरी अनेक भागात विशेषतः मुस्लिमबहुल भागातील नागरिकांची पाण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्यक्षात मोठा विलंब

एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, तांत्रिकदृष्या नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्यास त्यापेक्षा जास्त विलंब होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तापी योजनेची डिस्चार्ज झालेली जलवाहिनी पुन्हा भरून येण्यासाठी चार ते सहा तासांचा अवधी लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात जलकुंभ भरण्यासाठी पुन्हा या चार ते सहा तासांच्या विलंबाची भर पडली. त्यामुळे दीड दिवसांचा हा विलंब झाला. शिवाय यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा होऊन सहा दिवस झाले तेथे आठ दिवस झाले, ज्या भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होता, त्या भागातील पाणीपुरवठा दहा दिवसांवर गेला. या एकूणच परिस्थितीमुळे त्या-त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

हेही वाचा: मालकाने बांधले चक्क गायीचे मंदिर

काही भागात बंब, टँकर

पाणीपुरवठ्याच्या विलंबामुळे देवपूर भागातील लाला सरदार नगर येथे स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेचा अग्निशमन बंब मागवून पाणीपुरवठा करण्यात आला. बंबाद्वारे मागविलेले पाणी घेण्यासाठी नागरिक मोठ-मोठे ड्रम घेऊन आले होते. अशीच स्थिती मुस्लिम नगर भागातही होती, तेथे नगरसेवक अमीन पटेल यांनी शनिवारी बंब मागविला होता. आपल्या प्रभागातील हजारखोली, मिल्लत नगर, अंबिका नगर आदी भागात सहा-सात दिवस झाले पाणी नसल्याने नागरिकांची ओरड असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'या' गावात गावकरी घेतात नदीपात्रात पोहण्याचा आनंद

Web Title: People Of Dhule Get Water From Firefighters In Scorching Summer Dhule Water Crisis News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top