UP Election :भारतीयांना मायदेशी आणण्यात हयगय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

UP Election :भारतीयांना मायदेशी आणण्यात हयगय नाही

सोनभद्र: जगात भारताचे सामर्थ्य वाढल्यामुळेच युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी मोठे अभियान राबविले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त सोनभद्र येथे आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले, की ‘ऑपरेशन गंगा’तंर्गत आतापर्यंत हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांना घरी आणले आहे. सरकारने युक्रेनमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतीही हयगय केलेली नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताचे सामर्थ्य वाढल्याने युद्धकाळातही नागरिकांना सुरक्षितपणे आणण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले जात आहे. आज जगाची स्थिती आपण पाहत आहात. आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंतच्या चार टप्प्यांतील मतदानावरून भाजप आणि आघाडी पक्षाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बहुमत मिळणार असल्याचे सिद्ध झाले आहे. अपना दल, निषाद पक्ष असो किंवा भाजप असो सर्व उमेदवारांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. या आघाडीत उत्साह आणि आशेचा किरण दिसत आहे, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा: Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क

भारत सरकार आपल्या नागरिकांना परत आणण्यात कोणतीही कुचराई करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळात भारताला अधिक सामर्थ्यवान व्हावे लागेल. दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची सवय कमी झाल्यास भारत आणखी सामर्थ्यशाली होईल. भारतीय जवानांच्या शौर्याचा अपमान करणारे, भारतीय उद्योजकांच्या मेहनतीने चालणाऱ्या मेक इंडिया अभियानाची चेष्टा करणारे मंडळी आत्मनिर्भर भारत अभियानाची थट्टा उडवतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ

घराणेशाहीवर टीका

पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, घराणेशाहीने राज्य करणारे लोक देशाला कधीही शक्तीशाली करू शकत नाहीत. या घराणेशाहीतील नेत्यांनी देशाचा वारंवार अपमान केला आहे. हा उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या नेत्यांना वेळोवेळी सरकार स्थापनेची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्याला मागे ठेवण्याचे काम केले. या लोकांना कधीही माफ करू नका. आज सोनभद्रमध्ये हजारो घराचे बांधकाम झाले आहे. उर्वरित काम दहा मार्चनंतर योगी सरकार आल्यानंतर पुन्हा वेगाने सुरू होईल. प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळेल. प्रत्येकाला घर आणि प्रत्येक घरात नळाचे पाणी या योजनेसाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख कोटींची तरतूद केल्याचे मोदी यांनी सांगितले.

कोरोनास रोखण्याचे कडुनिंबात सामर्थ्य

नवी दिल्ली, ता.२ (पीटीआय) ः सर्वाधिक औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या वृक्षाचा आणखी एक अनोखा फायदा समोर आला आहे. या झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या औषधाचा कोरोनावरील उपचारात तर उपयोग होतोच पण त्याचबरोबर या विषाणूच्या संसर्गाला देखील ते पायबंद घालत असल्याचे दिसून आले आहे. कोलकत्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कडुनिंबाची झाडे आढळून येतात. भारतीय आयुर्वेदाने फार पूर्वीच या वृक्षाचे औषधी गुणधर्म ओळखून त्यांचा विविध आजारांवरील उपचारामध्ये वापर करायला सुरूवात केली होती, अशी माहिती संशोधकांनी दिली. कडुनिंबाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या अर्काचा मलेरिया, पोटदुखी, अल्सर, त्वचा विकार आणि अन्य आजारांवरील उपचारासाठी वापर केला जातो.

‘जर्नल व्हायरोलॉजी’ या नियतकालिकामध्ये ताजे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये कडुनिंबाच्या झाडात मोठ्या प्रमाणावर व्हायरल प्रोटीन असल्याचे उघड झाले आहे. मूळ कोरोना विषाणू आता वेगवेगळ्या रुपामध्ये समोर येतो आहे. या कोरोनाच्या उपप्रकारांना रोखण्याचे सामर्थ्य देखील कडुनिंबामध्ये असल्याचे दिसून आले.

आयसर कोलकत्याच्या शास्त्रज्ञांचे संशोधन; ‘जर्नल व्हायरोलॉजी’मध्ये संशोधन प्रसिद्ध

म्हणून औषध प्रभावी

कडुनिंबावर आधारित उपचारपद्धतीचा विकास घडवून आणणे हा या संशोधनाच्या मागचा मुख्य हेतू होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो, त्या आजारांना रोखण्याचे सामर्थ्य देखील कडुनिंबामध्ये असल्याचे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोमधील संशोधक मारिया नागेल यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रत्येक उपप्रकाराला रोखणारी उपचार पद्धती संशोधक विकसित करू शकत नाही. अशा स्थितीमध्ये कडुनिंबापासून तयार करण्यात आलेले औषध अधिक प्रभावी ठरू शकते.

Web Title: Up Election Indians Cannot Repatriated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top