
Uttarpradesh: योगींनी निवडणुकीत साधली जातीय समीकरणे
लखनौ : योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये तरुण आणि अनुभवी नेत्यांमध्ये एकप्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. पूर्वीच्या २१ मंत्र्यांना कायम ठेवतानाच ३१ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हे करताना जातीय आणि प्रादेशिक गणितांचा प्राधान्याने विचार करण्यात आल्याचे दिसून येते. लोकसभेवर ८० खासदार पाठविणाऱ्या उत्तरप्रदेशावर आपलीच एकहाती सत्ता कशी राहील? याचा प्राधान्याने विचार करण्यात आल्याचे दिसून येते. योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, त्यांच्यासोबत अन्य ५२ मंत्र्यांचा देखील शपथविधी देखील पार पडला होता. ‘योगी- २.०’ मध्ये ५२ नवे मंत्री असून त्यातील ३६ जण हे ४० ते ६० वयोगटातील असून दोघेजण हे चाळिशीखालील आहेत अन्य बाराजणांचे वय हे साठपेक्षा अधिक आहे.
संदीपसिंह सर्वांत तरुण
स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री अरुणकुमार सक्सेना सलग तिसऱ्यांदा बरेलीमधून आमदार म्हणून निवडून आले असून त्यांचे वय ७३ वर्षे एवढे आहे. ते सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत. दिवंगत नेते कल्याणसिंह यांचे नातू संदीपसिंह हे सर्वांत तरुण सदस्य असून त्यांचे वय ३१ वर्षे एवढे आहे. याच मंत्रिमंडळातील अनेक सदस्य हे पदवीधर तर काहीजण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत तर काहींचे शिक्षण हे फक्त इयत्ता आठवीपर्यंत झाले आहे.
जातीय समीकरणे
योगींच्या मंत्रिमंडळामध्ये अन्य मागासवर्गीयांतील (ओबीसी) १९ नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली असून ठाकूर आणि ब्राह्मण समुदायाच्या वाट्याला प्रत्येकी सात मंत्रिपदे आले आहेत. आठ मंत्री हे दलित असून चार मंत्रिपदे वैश्य समुदायाला देण्यात आली आहेत. या मंत्रिमंडळामध्ये शीख आणि मुस्लिम नेत्यालाही मंत्री करण्यात आले आहे.
भौगोलिक गणिते
भौगोलिक रचनेचा अभ्यास केला तर पश्चिम उत्तरप्रदेशातून २३ जणांना मंत्रिपदे देण्यात आली असून मागील खेपेस केवळ बारा नेत्यांनाच संधी मिळाली होती. पूर्व उत्तरप्रदेशच्या वाट्याला १४ मंत्रिपदे आली असून मागीलवेळेपेक्षा याखेपेस मंत्रिपदाची संख्या तीनने घटली आहे. मध्य उत्तरप्रदेशातून बाराजणांना मंत्री करण्यात आले असून या भागाला यंदा एक मंत्रिपद कमी मिळाले आहे.
नवे गेले, जुने आले
उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना याखेपेस मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. सतीश महाना, रमापती शास्त्री, जयप्रताप शाही, सिद्धार्थनाथ सिंह आणि श्रीकांत शर्मा यांनाही वगळण्यात आले आहे. कॅबिनेटमधील नव्या चेहऱ्यांमध्ये बेबी राणी मौर्य, जयवीर सिंह, सनदी सेवा सोडून राजकारणी बनलेले ए.के.शर्मा, राकेश सच्चान यांचा समावेश आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या ‘अपना दल’चे (सोनेलाल) आशिष पटेल आणि ‘निशाद पक्षा’चे संजय निशाद यांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलिस सेवेचा राजीनामा देत राजकारणात येणारे असीम अरुण यांनाही मंत्रिपद मिळाले असून दयाशंकर सिंह यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
Web Title: Uttarpradesh Assembly Election Yogi Adityanath Drl98
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..