
UP Election 2022: गझवा ए हिंदचे स्वप्न भंगणारच; योगींचा उलटवार
लखनौ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत धर्मावर आधारित राजकारणाला वेग आला आहे. धार्मिक कट्टरपंथीय आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ‘हिजाब घालणारी एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे भाकीत केले असता आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उलटवार करत ‘गझवा ए हिंद’चे स्वप्न जगाच्या अंतापर्यंत पूर्ण होणार नाही, असा इशारा दिला. राज्य सरकारमध्ये महिलांना सन्मान आणि हक्क दिला असल्याचे योगी म्हणाले. (UttarPradesh Assembly Election Updates)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना म्हटले, की भारतीय व्यवस्था शरियतनुसार नाही तर घटनेनुसार चालायला हवी. आपल्या व्यक्तिगत आस्था आणि आवडीनिवडी या देश आणि संस्थांवर लागू होत नाहीत. उत्तर प्रदेशातील सर्व कर्मचाऱ्यांना भगवे कपडे घालण्याचे आदेश मी देऊ शकतो का? असे होऊ शकत नाही. शाळेत ड्रेस कोड असायला हवा. पहिल्या टप्प्यांतील मतदानाची स्थिती पाहता भाजपला प्रचंड बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
पहिल्या टप्प्यानंतर मतदारांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांना गप्प बसवले असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलला आहे. अगोदर जात, मतांचे राजकारण, धर्म, कुटुंबाभोवतीच राजकीय व्यवस्था फिरत होती. आज विकास, सुशासन, ग्रामीण भाग, शेतकरी, तरुण आणि महिला सक्षमीकरणाबाबत विचार केला जात आहेत.
८० टक्के लोक सरकारच्या बाजूने
आपण ८० विरुद्ध २० असे म्हटले होते. ८० टक्के भाजपसमवेत तर २० टक्के हे नेहमीच विरोध करत राहतात, असा त्याचा अर्थ होता. आम्ही जात, मत किंवा धर्मांचा विचार केला नव्हता. ८० टक्के लोक हे राज्यातील सरकार चांगल्या रीतीने काम करण्याबाबत आग्रही असतात तर २० टक्के लोक हे नेहमीच विरोध करतात, असे स्पष्टीकरण योगी आदित्यनाथ यांनी दिले. उत्तर प्रदेशात २०१७ च्या अगोदर तीन चार दिवसाला दंगली व्हायच्या आणि संचारबंदी लागू करावी लागत होती. अराजकतेने कळस गाठला होता आणि गुंडगिरी वाढली होती. परंतु पाच वर्षात दंगल झाली नाही. संचारबंदीही लागू झालेली नाही. राज्यात कावड यात्रा शांततेत निघत आहेत, असे योगी म्हणाले.
Web Title: Uttarpradesh Yogi Adityanath Owaisi Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..