जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरुन भाजप-सेना आमदारांमध्ये कलगीतुरा !

अरूण जैन
रविवार, 5 जुलै 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चांगले काम करतात की नाही ? यावरून भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या वादामध्ये सर्वप्रथम खामगाव चे आमदार आकाश फुंडकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड व चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी उडी घेतली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांची पाठराखण करीत आहेत, तर भाजपा आमदार त्यांना विरोध करून ते असंवेदनशील असल्याचा आरोप करीत आहेत. याबाबत मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत आपण आपले काम करीत असून, राजकीय वादात पडण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

बुलडाणा ः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चांगले काम करतात की नाही ? यावरून भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

या वादामध्ये सर्वप्रथम खामगाव चे आमदार आकाश फुंडकर, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड व चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी उडी घेतली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांची पाठराखण करीत आहेत, तर भाजपा आमदार त्यांना विरोध करून ते असंवेदनशील असल्याचा आरोप करीत आहेत. याबाबत मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत आपण आपले काम करीत असून, राजकीय वादात पडण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या असंवेदनशील आहेत, त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुलडाण्यात एकही तपासणी लॅब नाही त्यामुळे तपासणी वेळेवर होत नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा प्रचंड मोठा असल्याने स्वतंत्र लॅब आवश्‍यक आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत असल्याच्या भावना भाजपा आमदार आकाश फुंडकर व श्वेता महाले यांनी व्यक्त केल्या आहेत. तर नेमकी या उलट प्रतिक्रिया बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे, की जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीपासूनच अत्यंत गांभीर्याने व पद्धतशीरपणे परिस्थिती हाताळली आहे. सैलानी यात्रा रद्द करण्याच्या निर्णयापासून ते जिल्हाभरात सर्व यंत्रणांना सक्रिय करण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्या स्वतः फिरून सर्व लक्ष घालून काळजीपूर्वक कोरोनाशी लढा देण्याकरिता सज्ज आहेत. आरोग्य महसूल व पोलिस यंत्रणेने व्यवस्थित समन्वयाच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच बुलडाणा शहरातील व जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्या म्हणतात की, आपण आवश्‍यकतेनुसार योग्य ती सर्व खबरदारी घेत आहोत. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आपण कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये कुठलीही कसर ठेवली जात नाही. बुलडाणामध्ये तपासणी लॅब सुरू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. मात्र शासनाने नंतरच्या टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या ठिकाणी या लॅब सुरू केल्या आहेत. अकोला येथील लॅबमधून आपल्याला वेळेवर रिपोर्ट प्राप्त होत आहेत.

मात्र तरीही आपल्या जिल्ह्यात स्वतंत्र लॅब सुरू करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्‍यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. सामान्य नागरिकांनी कोणत्याही राजकीय वादात न पडता या जीवघेण्या आजारापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola battel among BJP-Sena MLAs over Collector's efficiency!