esakal | शैक्षणिक शुल्कात अडकले ऑनलाइन शिक्षण, शुल्क अदा न केल्यास ‘नो जॉईनिंग’ 
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim Online tuition stuck in tuition fees, no joining if fees are not paid

कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त झाली असून, शिक्षण व्यवस्थाही गलितगात्र झाली आहे. काही खाजगी सरकारचे अनुदान घेणाऱ्या शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाले असले तरी, ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क अदा केले नाही त्या विद्यार्थ्यांना या ऑनलाइन वर्गापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शैक्षणिक शुल्कात अडकले ऑनलाइन शिक्षण, शुल्क अदा न केल्यास ‘नो जॉईनिंग’ 

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम  ः कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त झाली असून, शिक्षण व्यवस्थाही गलितगात्र झाली आहे. काही खाजगी सरकारचे अनुदान घेणाऱ्या शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाले असले तरी, ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क अदा केले नाही त्या विद्यार्थ्यांना या ऑनलाइन वर्गापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरी भागात हे चित्र असताना ग्रामीण भागात हाताला काम नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे कसे या विवंचनेत पालकांची घालमेल होत आहे.


कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नजिकच्या काळात शाळा सुरू होणेही शक्य नाही. यामध्ये ऑनलाइन अ‍ॅपव्दारे वर्ग घेण्याची शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र या कठीण परिस्थितीत खाजगी अनुदानित शाळांच्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याने २०२०-२०२१ चे शैक्षणिक शुल्क जमा केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याच विद्यार्थ्यांना या ऑनलाइन वर्गामध्ये सहभागी करून घेतले जाते. ज्या विद्यार्थ्यांनी हे शुल्क अदा केले नाही. त्या विद्यार्थ्याला या ऑनलाइन वर्गाचा मागमुसही नसल्याचे वास्तव समोर येत आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक शुल्क वाढ न करण्याबाबत सक्त आदेश जारी केले असताना खाजगी संस्थाचालक मात्र कोरोनाच्या या कठीण काळात शिक्षणाचा बाजार मांडत विद्यार्थी व पालकांकडून वाढीव शुल्क मागत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.

वर्ग ऑनलाइन, ग्रंथालयाचे शुल्क कसे
शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क जमा केले आहेत, त्या विद्यार्थ्यांकडून या शुल्कामध्ये ग्रंथालय शुल्कही आकारण्यात आले आहे. जर वर्ग ऑनलाइन असतील तर, विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

पोटाची भ्रांत, शुल्क भरावे कसे?
आतापर्यंत पोट भरण्यासाठी चहा टपरीचा व्यवसाय करीत होतो. मात्र गेल्या तीन महिण्यापासून हा व्यवसाय बंद झाला आहे. या कठीण परिस्थितीत पोटाचा प्रश्न सोडवता सोडवता दमछाक होत असताना आता मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैसे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलं शिक्षणापासून वंचित राहतात हे पहावतही नाही व पैशाची सोय करता येत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रीया वाशीम येथील चहा टपरीचा व्यवसाय करणारे पालक नारायण कालवे यांनी दिली.