सांडपाणी व विनापरवाना बांधकाम पोहोचले मंत्रालयात!

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 2 July 2020

ओंकार कॉलनी वार्ड क्रमांक तीन मधील अरिहंत विद्यामंदिर मराठी शाळेजवळ सांडपाण्याची मोठी गटारगंगा साचली आहे. याप्रकरणी नागरिकांनी मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत गटारगंगेच्या मुद्द्यासोबत विनापरवाना बांधकामाचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आला आहे.

शिरपूर (जि.वाशीम) ः  ओंकार कॉलनी वार्ड क्रमांक तीन मधील अरिहंत विद्यामंदिर मराठी शाळेजवळ सांडपाण्याची मोठी गटारगंगा साचली आहे. याप्रकरणी नागरिकांनी मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत गटारगंगेच्या मुद्द्यासोबत विनापरवाना बांधकामाचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आला आहे.

ओंकार कॉलनी ही नवीन वसाहत असून, कॉलनी निर्माण झाली त्यावेळी नगररचना विभागाच्या आदेशानूसार लेआऊट मालकाने नाल्या, रपटे तयार करून संपूर्ण सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची व्यवस्था करून दिली होती. त्यामुळे ओंकार कॉलेनीची एन.ए. ऑर्डर, लेआऊट नकाशा, शेत सर्व्हे नंबर नकाशा व पावसाच्या पाण्याची वहीवाट इत्यादी बाबींची बारकाईने पाहणी केल्यास हा प्रश्न चुटकीसरशी निकाली निघून जाऊ शकतो. परंतु 26 जून रोजी ओंकार कॉलनीतील रहिवाशांनी ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी तथा नगररचना विभागाला दिलेल्या या तक्रारीत विनापरवाना बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशी घ्यावी लागते बांधकामाची अधिकृत परवानगी
ग्राम पंचायतकडून बांधकामाची लेखी परवानगी घेण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेत प्लॉट मालकीची कागदपत्रे, एन.ए. ऑर्डर, ले-आऊट नकाशा, ग्रा.पं.ची करपावती व सोबत बांधकामाचा आराखडा इत्यादी कागदपत्रांची फाईल ग्रामपंचायतला सादर करायची असते. ग्रामपंचायतने तो प्रस्ताव सभेत मांडायचा असतो. सभेने ठरावाद्वारे त्या प्रस्तावाला मंजूरात द्यायची असते. त्यानंतर ग्रा.पं.ने ते फाईल दप्तरी ठेवून बांधकामाची लेखी परवानगी प्लॉट मालकाला द्यायची असते.

तक्रारकर्त्यांचीच उडाली झोप!
ओंकार कॉलनीतील, अरिहंत विद्यामंदिर व इतरांकडे अशी अधिकृत बांधकाम परवानगी आहे? तेव्हा पावसाच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मुद्दा उचलत असताना ‘विनापरवाना’ बांधकामाचा विषारी साप तक्रारकर्त्यांनी डिवचला तरी कशाला? तक्रारीच्या निमित्ताने विनापरवाना बांधकामाच्या या भस्मासुराने तक्रारकर्त्यांच्याच डोक्यावर हात ठेवला तर? या विचाराने तक्रारकर्त्यांपैकी अनेकांची झोप उडाली आहे. या तक्रार अर्जावर पत्रकार, बँक व्यवस्थापक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी व अरिहंत शाळेच्या मुख्याध्यापकांची सुद्धा स्वाक्षरी आहे, हे विशेष!

ग्रामपंचायत खंबीर भूमिका घेईल का?
सांडपाण्याचा मुद्दा मंत्रालयात नेण्याच्या नादात कॉलनीतील रहिवाशांचा पाय खोलात गेला की काय? तक्रारकर्त्यांची व कॉलनीतील रहिवाशांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’, अशी तर होणार नाही ना? याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. शिवाय या प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत खंबीर भूमिका घेईल का? याकडे शिरपूर वासियांचे लक्ष लागले आहे.

कागदपत्रांची पाहणी करून ओंकार कॉलनीतील सांडपाण्याचा प्रश्न तर सोडवला जाईल. परंतु अनधिकृत परवानगी अथवा विनापरवाना बांधकामांची गय केली जाणार नाही.
- सुनिता गणेश अंभोरे, सरपंच, ग्रामपंचायत शिरपूर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Sewage and unlicensed construction reached the Ministry!