साहेब! फटके मारा पण पैसे नाहीत!, कारवाईच्या नावाखाली गोरगरीबांना दंड 

राम चौधरी
शनिवार, 11 जुलै 2020

आधीच कोरोनामुळे रोजगार नाही त्यात मिळालेला रोजगार शासकिय दंडाच्या नावाखाली ओरबडला जात असेल तर या दंडापेक्षा कोरोना परवडला अशा प्रतिक्रिया येत आहेत.

वाशीम : कोरोनाच्या सावटात दिवसभर राबराब राबून मिळालेली 200 रूपये मजुरी घेवून घराकडे निघतांना 30 रूपयाचे पेट्रोल टाकून शहराबाहेर निघायचे तोच पोलीसदादा काठी आडवी लावतात. परवाना नाही तर मास्क का नाही किंवा डबलसिट का चालला या कारणावरून चक्क 500 रूपयाचा दंड ठोठावतात. पाचावर दोन शुन्य असलेली नोट गेल्या तीन महिण्यात डोळयानेही न पाहलेला व 200 रूपयाच्या मजुरीत चिल्यापिल्याचे पोट भरणार्‍या मजुराच्या तोंडून  ‘साहेब दोन फटके मारा मात्र दंडाचे पैसे नाहीत ’ हे शब्द बाहेर पडतात, ही अगातिकता वशीम शहरातून बाहेर जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर दिसते.

आधीच कोरोनामुळे रोजगार नाही त्यात मिळालेला रोजगार शासकिय दंडाच्या नावाखाली ओरबडला जात असेल तर या दंडापेक्षा कोरोना परवडला अशा प्रतिक्रिया येत आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्हयामध्ये गेल्या तिन महिण्यापासून कोरोनाने हैदोस घातला आहे. मजूरवर्गाची हाल पाहावत नाहीत अशी परिस्थीती आहे. मात्र अनलॉकच्या दुसर्‍या टप्यामध्ये शहरात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. किराणा दुकाने, बांधकाम साईट, हमाली येथे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला.

या रोजंदारीमध्येही घट झाली आहे. 300 ते 350 रूपये मिळाणारी मजुरी 200 रूपयावर आली आहे. ग्रामीण भागातही शेतकर्‍याचे अर्थचक्र खोलात रूतल्याने ग्रामीण भागातही हाताला काम नाही. त्यामुळे मजुरांना नाईलाजाने शहरात मिळेल त्या मजूरीत मजुरी करावी लागत आहे. मात्र या मजूरांवर  आता कोरोनापेक्षाही गंभीर संकट समोर उभे राहिले आहे.

दिवसभर काम केल्यानंतर मजुरीचे मिळणारे 200 रूपये घेवून कामाच्या ठिकाणावरून निघतांना शंभर ते दिडशे रूपये तेल मिठाच्या खरेदीत जातात. उरलेल्या 50 रूपयात वाहनात 30 रूपयाचे पेट्रोल टाकले जाते. दिवसभराच्य घामाच्या कमाईतून उरलेले विस रूपये खिशात टाकून घराकडे जात असतांना शहराच्या बाहेर प्रत्येक रस्त्यावर दोन कि.मी. अंतरावर पोलीसदादाचा दंडूका आडवा येतो.

कधी परवाना नसल्याचे कारण दिले जाते तर कधी डबलसिट असल्याचे कारण सांगून 500 रूपयांची पावती हात दिली जाते. मजुरीचे विस रूपये खिशात असल्यानंतर 500 रूपयांची पावती या गरीबावर आकाश कोसळणारी घटना ठरते. हा खेळ जिल्हयाच्या प्रत्येक रस्त्यावर खेळला जातो.

..

ग्रामीण भागच टार्गेट
 विनामास्क किंवा मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करतांना ग्रामीण भागच टार्गेट केल्या जातो. शहराच्या बाहेर 2 ते 3 किलो मिटर अंतरावर कधी जिल्हा वाहतूक शाखा, कधी शहर वाहतूक शाखा भरीस ग्रामीण पोलीसांचीही फेरी यामध्ये ग्रामीण भागातून शहरात येणारे व शहरातून घरी परत जाणारे गोरगरीब नागरिक नाडले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क वावरणे चुकीचे असले तरीही डबलसिट विनापरवाना वाहने थांबवून या कठीण परिस्थीतीत ही वेळ नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरामध्ये व्यापारी प्रतिष्ठानासमोर प्रचंड गर्दी होते. या गर्दीमध्ये अनेकांना मास्क नसतात सामाजिक दुरावा पाळला जात नाही. याबाबत कारवाई होणे अपेक्षीत असतांना सगळा भार ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या जगण्यावर पडत आहे. जिल्हा पोलीस दलाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार लॉकडाऊन ते अनलॉक या दरम्यान 4 हजार 316 कारवायांमधून 13 लाख 77 हजार 400 रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे. विनामास्क व प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संचारबंदी मोडणार्‍या विरोधात कारवाई समर्थनीय असली तरी प्रशासनाने मानवीयदृष्टीकोनातून गोरगरीब मजूरांची परिस्थीती लक्षात घेण्याची गरज आहे.

पोलीस प्रशासनाचाही नाईलाज
रस्त्या रस्त्यांवर कारवाया करतांना खाकीतील माणूसकीही हळहळून जात असल्याचे चित्र आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाणे व शाखांना कारवायांचे लक्ष नेमून दिल्याने त्यांचाही नाईलाज होतो. ही दंडाची रक्कम शासनाच्या महसूल विभागात जमा होते. गेल्या तिन महिण्यापासून पोलीस प्रशासन रस्त्यावर कोरोनाशी लढा देत आहे. साप्ताहिक रजाही मिळत नसतांना आता या नवीन लक्षामुळे पोलीसांनाही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. पावती फाटतांना दंडाची रक्कम घेतांना दिड फुटाच्या आतच दुरावा राहत असल्याने प्रशासनाने या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.


शहरी भागामध्ये व्यापारी प्रतिष्ठाने व रस्त्यावर सामाजिक दुरावा पाळल्या जात नसेल किंवा काही लोक विनामास्क वावरत असतील तर या बाबत संबंधीत विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. नागरीकांनी कोरोनाला हरविण्यासाठी सामाजिक दूराव पाळावा, काम असल्याशिवाय विनामास्क बाहेर पडूच नये. प्रशासनाला सहकार्य करावे.
-ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी वाशीम 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir! Strike but no money !,akola washim Punish the poor in the name of action