Maratha Kranti Morcha : लाख मराठ्यांमुळे कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

नागपूर - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ‘नागपूर बंद’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आंदोलन चांगलेच यशस्वी झाले. शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. बसेस तसेच पेट्रोलपंप बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. मानकापूर रेल्वेपुलाजवळ काही आंदोलकांनी रेल्वेगाडीसमोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. काही तुरळक अपवाद वगळता आंदोलन शांततेत पार पडले.

नागपूर - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ‘नागपूर बंद’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आंदोलन चांगलेच यशस्वी झाले. शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. बसेस तसेच पेट्रोलपंप बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. मानकापूर रेल्वेपुलाजवळ काही आंदोलकांनी रेल्वेगाडीसमोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. काही तुरळक अपवाद वगळता आंदोलन शांततेत पार पडले.

मराठा समाजाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी आधीच सुटी जाहीर केली. महाल, बर्डी, इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ या शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद होत्या. पोलिस चौकाचौकांमध्ये तैनात असल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. 

मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात महाराष्ट्र बंदला सर्वाधिक पाठिंबा मिळाला. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मराठा समाजबांधव महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भगवे झेंडे खाद्यांवर घेऊन एकत्रित आले. येथे महाआरती केल्यानंतर घोषणा देत दुचाकीवरून शहराच्या विविध भागात रवाना झाले. 

आग्याराम चौकात आंदोलक महिलांनी ठाण मांडून या मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. दुपारी व्हेरायटी चौकात मराठा समाजबांधव दाखल झाले. घोषणा देत रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक खोळंबली होती. चौकालगतचा मॉल बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील विविध भागांतील व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. तुरळक संख्येने सुरू असलेली दुकाने आंदोलक पोहोचण्यापूर्वीच बंद करण्यात येत होती. अपवादात्मक घटना वगळता उपराजधानीत बंद शांततेत पार पडला. 

कार्यालये बंद, ट्रॅव्हल्स मात्र सुरूच
गणेशपेठ, मानस चौकासह विविध भागातील ट्रॅव्हल्सची कार्यालये बंद असल्याचे दिसून आले. मात्र, अनेक खासगी बसेस रस्त्यावरून धावत होत्या. विरोधाच्या ठिकाणी माघारत घेत बसचालकांनी नुकसान टाळले. अमरावती मार्गाने येणाऱ्या खासगी बसला आंदोलकांनी महाराजबाग चौकात रोखले. बस बाजूला लावा, अन्यथा काचा फुटतील असा इशारा दिला. मागून येणारी आणखी एक बस आंदोलकांनी रोखली. याप्रकाराने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही चालकांनी नमते घेत वाहन बाजूला सारल्याने प्रकरण निवळले.

महिलांचा लक्षणीय सहभाग
महालातील कोतवाली, बडकस चौक, गांधीगेट, शुक्रवारी तलाव, गणेशपेठ, केळीबाग रोड,  सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग, अग्रसेन चौक, हॅण्डलूम मार्केट, सराफा ओळी, धान्य बाजार,  गांजाखेत, गोळीबार चौक, कमाल चौक, सक्करदरा, रामदासपेठ, धंतोली, यशवंत स्टेडियम, कॉटन मार्केट चौक, ग्रेट नाग रोड, गणेशपेठ या शहरातील व्यस्ततम भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. शहराच्या विविध भागांतील आंदोलकांमध्ये तरुणी, महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. 

महाल परिसराला छावणीचे स्वरूप 
महाल येथून आंदोलनाची सर्व सूत्रे हलत असल्याने पोलिसांनी सर्वाधिक बंदोबस्त याच परिसरात ठेवला होता. यामुळे महालला छावणीचे स्वरूप आले होते. ठिकठिकाणचे रस्ते, चौकांमध्ये पोलिस तैनात होते. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी या परिसरात फिरत होते. 

गणेशपेठ स्थानकासमोर बस फोडली
पालकमंत्र्यांना घेराव
रेल्वेगाडीसमोर उडी घेण्याचा प्रयत्न
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
खासगी ट्रॅव्हल्स अडविल्या
पेट्रोलपंप बंद
लॉ कॉलेज चौकात पेट्रोलपंप जाळण्याचा प्रयत्न 
कृषी साहित्य विक्री केंद्र बंद
आग्याराम देवी चौकात महिलांचे  बैठे आंदोलन
आंदोलनात महिला आघाडीवर
बसच्या चाकातील हवा काढली
जिल्ह्यातील ९६५ बसफेऱ्या रद्द 
मानकापुरात रस्त्यावर टायर जाळले
इतवारीत महिलांनी केली दगडफेक
पोलिस रात्रभर रस्त्यांवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Nagpur bandh