‘नीट’ परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

मंगेश गोमासे
Sunday, 13 September 2020

‘नीट’साठी दुपारी दोन वाजता पेन अँड पेपर बेस परीक्षेस सुरुवात झाली. त्यासाठी केंद्रावर दीड वाजतापर्यंत प्रवेश देण्यात आला. दरम्यान, सर्व केंद्रांवर सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, थर्मल स्कॅनिंगची सोय करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगसाठी एक वर्गात १२ विद्यार्थी बसविण्यात आले होते.

नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)द्वारे आज रविवारी नागपूरसह देशातील १५५ शहरांत घेण्यात आलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेन्स टेस्ट (नीट) शहरात ६४ केंद्रांवर शांततेत पार पडली. मात्र, पेपर संपल्यावर केंद्रांसमोर वाहने आणि नागरिकांनी गर्दी केल्याने ‘सोशल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा उडाला. शहरात २५ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

‘नीट’साठी दुपारी दोन वाजता पेन अँड पेपर बेस परीक्षेस सुरुवात झाली. त्यासाठी केंद्रावर दीड वाजतापर्यंत प्रवेश देण्यात आला. दरम्यान, सर्व केंद्रांवर सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, थर्मल स्कॅनिंगची सोय करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगसाठी एक वर्गात १२ विद्यार्थी बसविण्यात आले होते. पाच वाजता पेपर सूटताच केंद्राबाहेर पालकांनी आपल्या वाहनांसह एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

महत्त्वाची बातमी - संतापजनक प्रकार! शेत दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक एक पसार 

दुपारी सोशल डिस्टॅन्सिंगचे पालन करून नवा आदर्श निर्माण केला; मात्र पेपर सुटताच गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसले. दरम्यान, परीक्षेत बायोलॉजीचे प्रश्न सोपे तर केमिस्ट्रीचे प्रश्न काहीसे कठीण आणि फिजिक्स विषयाचे प्रश्न सोडविण्यात विद्यार्थ्यांना खूप वेळ द्यावा लागला.

७२० गुणांचे प्रश्‍न

एनटीएद्वारे नुकतेच प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. ७२० गुणांची परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांचे १८०-१८० गुणांचे ४५-४५ प्रश्‍न विचारण्यात आले. जीवशास्त्र विषयात ३६० गुणांचे ९० प्रश्‍न विचारण्यात आले. परीक्षा हिंदी, इंग्रजीसह विविध ११ प्रादेशिक भाषांत घेण्यात आली.

परीक्षा केंद्राबाहेर ‘जाम’

शहरातील ६४ परीक्षा केंद्रावर ‘नीट’ घेण्यात आली. यात तालुक्याच्या ठिकाणी केंद्र तयार करण्यात आले. मात्र, काही शहरांतील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातीळ परीक्षेसाठी जावे लागले. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पाच वाजता पेपर सुटल्यावर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांच्या बाहेर ट्रॅफिक जाम लागला होता. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचविण्यासाठी दुचाकी आणि कारचा उपयोग केला होता. त्यामुळे केंद्राबाहेर कारच्या रांगा लागल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘NEET’ in silence, Biology simple, Physics took time