नाट्यसंमेलनाचा मुहुर्त हरवला, अध्यक्षांनी पुसले वेळापत्रक 

राघवेंद्र टोकेकर
सोमवार, 22 जून 2020

सांगली येथून 27 मार्चला प्रारंभ होणारे शंभरावे मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचणार होते. त्याचे नियोजन झाले होते, केवळ घंटा वाजणेच बाकी असताना कोरोनाने घात केला. या नाट्य संमेलनाचा समारोप 14 जूनला मुंबईत होणार होता. नियामक मंडळाच्या बैठकीत नाट्य संमेलनाच्या खर्चासाठी 50 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात घडले भलतेच.

नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेक मोठ्या सभा, जाहीर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेत. ते भविष्यात कधी होतील याचा अंदाजही बांधता येत नाही. याच संकटात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मुहुर्त देखील हरवला. अख्खे आयोजनच रद्द करण्याची वेळ आल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांवर संमेलनाचे वेळापत्रक पुसण्याची दूर्देवी वेळ आली आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गाजावाजा करीत राज्यव्यापी आयोजनाचे वेळापत्रक जाहीर केले. विशेष म्हणजे यात विदर्भाला विंगेबाहेर ठेवले. आयोजन शतकमहोत्सवी असल्याने ते दिमाखदार व्हावे असा बेतही परिषदेचा होता, पण कोरोनाच्या संकटाने त्याला ग्रहण लागले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय नाट्य परिषदेला घ्यावा लागला अन्‌ कोणत्याही समितीच्या अध्यक्षांवर येऊ नये ती वेळ नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या नशिबी आली आहे. 

वाचा : कलावंतांच्या मदतीसाठी गुरूनाथच्या वडिलांनी घेतली महापौरांची भेट

सांगली येथून 27 मार्चला प्रारंभ होणारे शंभरावे मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचणार होते. त्याचे नियोजन झाले होते, केवळ घंटा वाजणेच बाकी असताना कोरोनाने घात केला. या नाट्य संमेलनाचा समारोप 14 जूनला मुंबईत होणार होता. नियामक मंडळाच्या बैठकीत नाट्य संमेलनाच्या खर्चासाठी 50 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात घडले भलतेच.

14 जूनला शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मुंबईत समारोप होणार होता. मराठी नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा ही आपली सांस्कृतिक संपत्ती असली तरी, संकटापुढे थांबणेही गरजेचे आहे. नाट्यसंमेलनाचा नियोजित कार्यक्रम फळ्यावरून पुसताना एक विश्वास वाटतो की, मराठी नाटकाचे रसिकमायबाप लवकरच मोठ्या संख्येने नाट्यगृहात परततील. प्रेम याच विश्वासाने व नव्या उमेदीने प्रायोगिक, व्यावसायिक आणि सर्वच थरातील नाट्यचळवळ उभी राहील. शंभरावे नाट्यसंमेलनही आपण दिमाखात साजरे करू, अशी आशा बाळगतो. 
- नवनाथ (प्रसाद) कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. 

नुकताच इन्स्टाग्रामवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी यांनी वेळापत्रक पुसत असल्याचे फोटो शेअर केलेत आणि प्रतिक्रीयाही कळवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 marathi natya sammelan news