देशातील पहिल्याच अंडरपासमधून 11 वाघांचे भ्रमण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 महाराष्ट्रामधील पेंच व्याघ्रप्रकल्पातून जातो. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले होते.

नागपूर : नागपूर ते शिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसाठी बांधण्यात आलेल्या अंडरपासचा वापर 18 प्रजातींचे वन्यजीव करीत असल्याची नोंद वन्यजीव संशोधकांनी केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 11 वाघांचा समावेश आहे. याशिवाय गवा, सांबर, चितळसारखे वन्यजीवही या पुलाखालून सुरक्षित ये-जा करीत आहेत. कान्हा ते पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच "अंडरपास' आहेत.

अवश्य वाचा - फुटपाथ दुकानदारच उभे झाले तुकाराम मुंढेंच्या विरोधात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 महाराष्ट्रामधील पेंच व्याघ्रप्रकल्पातून जातो. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्राधिकरणाने "भारतीय वन्यजीव संस्थानमधील (डब्ल्यूआयआय) तज्ज्ञांच्या मदतीने या महामार्गावर काही बांधकाम केले. यामध्ये 50 ते 750 मीटर आकाराचे नऊ अंडरपास बांधण्यात आले. अंडरपास म्हणजे महामार्ग स्वरूपाचा बांधून त्याखालून वन्यजीवांना सुरक्षित हालचाल करण्याची सोय निर्माण करून देणे.

मार्च ते डिसेंबर 2019 या कालावधीत "डब्ल्यूआयआय'चे संशोधक या अंडरपासचा वापर करणाऱ्या वन्यजीवांची नोंद करीत होते. अंडरपासखाली कॅमेरा ट्रॅप लावून घेतलेल्या या नोंदीमध्ये 5 हजार 450 छायाचित्रे मिळाली आहेत. त्यामधील 89 छायाचित्रे वाघांची असल्याची माहिती "डब्ल्यूआयआय'चे बिलाल हबीब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या छायाचित्रांची छाननी केली असता 11 वाघ या अंडरपासचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वाघांशिवाय या अंडरपासखालून अधिकवेळा रानकुत्रे, रानमांजर, चितळ आणि रानडुकरे जात असल्याचेही उघडकीस आले आहे.

छोट्या प्राण्यांची 5 हजार 450 छायाचित्रे

वाघांपेक्षाही या अंडरपासचा वापर सांबर, रानकुत्रे, मुंगूस, चितळसारखे छोटे प्राणी करीत आहेत का, याची माहिती जाणून घेणे गरजेचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक आणि राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य किशोर रिठे म्हणाले. वाघ हा सहजरीत्या अशा प्रकारच्या बांधकामाचा वापर आपल्या हालचालींकरिता करतो. याउलट छोटे प्राणी अशा बांधकामाखालून हालचाल करताना घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. नऊ महिन्यांच्या या निरीक्षणादरम्यान संशोधकांना छोट्या प्राण्यांची 5 हजार 450 छायाचित्रे मिळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 tiger excursions through the underpass