उमरेड विभागातील १३० शेतकऱ्यांनी भरले तब्बल १७ लाख; महावितरणाचं महा कृषिऊर्जा अभियान जोरात 

योगेश बरवड 
Friday, 19 February 2021

महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी एकरकमी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला. पाचगाव येथील मेळाव्यात ३७ शेतकऱ्यांनी ५लाख ४५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला.

नागपूर ः शेतकऱ्यांचे वीजबिल थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी ऊर्जा अभियान आरंभिले आहे. त्या अंतर्गत महावितरणकडून उमरेड विभागातील पाचगाव, वेलतूर, कुही आणि उमरेड येथे शेतकरी मेळावे घेण्यात आले. महावितरणच्या आव्हानाला प्रतिसाद देत १३० शेतकऱ्यांनी एकरकमी १७ लाखांचा भरणा केला. अभियानांतर्गत नागपूर परिमंडळातील ५ हजार १०० शेतकऱ्यांनी ३ कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

हेही वाचा - कोरोना लस घेण्यात ग्रामिण पोलिस अव्वल; शहर पोलिसांमध्ये मात्र भीती; अल्पप्रतिसादामुळे `टेंशन’

महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी एकरकमी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला. पाचगाव येथील मेळाव्यात ३७ शेतकऱ्यांनी ५लाख ४५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला. यावेळी पाचगाव ग्राम पंचायतच्या सरपंच उषा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे, पंचायत समिती सदस्या प्रियांका लोखंडे उपस्थित होत्या. एकरकमी ३५ हजारांचा भरणा करणाऱ्या चंद्रभागा वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कुही येथील मेळाव्यात कुही पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, तितूरचे सरपंच घोडे पाटील, अकोला ग्राम पंचायतचे सरपंच गजानन धांडे, सिलाई ग्राम पंचायतचे सरपंच लालभाऊ दंडारे उपस्थित होते. तितूरचे सरपंच घोडे पाटील यांनी ९५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला. 

हेही वाचा - क्या बात है!  चिखलदरा तालुक्‍यात रोजगाराची विक्रमी नोंद; मेळघाटात घटले स्थलांतर

वेलतूर येथे झालेल्या मेळाव्यात अंभोरा येथील सरपंच राजू कुकडे यांनी सौर प्रकल्पाकरिता १२ एकर शासकीय जागा देण्याचा ग्रामपंचायतचा ठराव प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांना हस्तांतरित केला. उमरेड येथे झालेल्या मेळाव्यात उमरेड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, नगरसेवक सतीश चौधरी, उमेश हटवार उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 130 farmers paid 17 lacs rupees under MSEB Maha krushhi urja scheme