Video : पोटाची भूक भागवण्यासाठी 'तो' घेतो हातात चाकू अन्‌...

केवल जीवनतारे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अरबाज मूळचा भोपाळचा. घरी हाच व्यवसाय. यामुळे लहानपणापासून धार लावण्याचे पारंपरिक तंत्र त्याला अवगत झाले. मात्र, पोटासाठी धार लावण्याचे हे यंत्र हाती येईल, असे वाटत नव्हते. घरी सात भाऊ, बहीण असा भरला संसार. यामुळे पोटासाठी सारे कुटुंब घराबाहेर पडले. कोणी नागपुरात तर कोणी पांढुर्णा तर कोणी भोपाळमध्येच व्यवसाय करीत आहेत.

नागपूर : देशातील आर्थिक विषमता लक्षात घेतली तर एकीकडे अचाट संपत्ती तर दुसरीकडे जगण्यासाठी संघर्ष सुरू असलेला दिसतो. पूर्वीपासून हे चित्र असेच आहे. एका बाजूला पंचतारांकित हॉटेलमध्ये पाण्यासारखा पैसा उधळणारे हात तर दुसऱ्या बाजूला पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी त्यांच्या नशिबी लहानपणापासून धारेवरचं आयुष्य. हा मोहमंद अरबाज. याचंही असंच आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी तो लहानपणापासून चाकू-सुऱ्यांना धार लावण्याचे काम करतो. ताजबाग परिसरात तो राहतो. 

अरबाज मूळचा भोपाळचा. घरी हाच व्यवसाय. यामुळे लहानपणापासून धार लावण्याचे पारंपरिक तंत्र त्याला अवगत झाले. मात्र, पोटासाठी धार लावण्याचे हे यंत्र हाती येईल, असे वाटत नव्हते. घरी सात भाऊ, बहीण असा भरला संसार. यामुळे पोटासाठी सारे कुटुंब घराबाहेर पडले. कोणी नागपुरात तर कोणी पांढुर्णा तर कोणी भोपाळमध्येच व्यवसाय करीत आहेत. चिमुकल्या अरबाजच्या नशिबी मात्र नागपूर आले. सकाळीच पोटासाठी घराबाहेर पडणारा अरबाज "रोटी, कपडा' मिळवण्यासाठी धडपडतो. मकान त्याच्या नशिबी नाही. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारा चाकू, टेलरिंग व्यवसायासाठी लागणारी कैची, सुरा आदी वस्तूंना धार देत नवे रूप आणण्याचे काम अरबाज करतो.

सविस्तर वाचा - जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुखांचे नाव आघाडीवर

चौकात, घरोघरी किंवा एखाद्या अपार्टमेंटमध्ये जात "चक्कू छुरिया धार करलो' असे म्हणताना त्यांच्या पोटातील आतड्यांवर ताण पडतो. तहानेने व्याकुळ झाला की, एखाद्याकडे पाणी मागतो. वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच चाकू, सुऱ्यांना धार लावण्याचे यंत्र घेऊन तो नागपूर शहरात फिरतो. आज तो 15 वर्षांचा आहे. कधी पाठीवर तर कधी सायकलवर यंत्र घेऊन तो दिवसाला पन्नास किलोमीटरचा प्रवास करतो, तेव्हा त्याच्या खिशात दीडशे ते दोनशे रुपये जमा होतात. दिवसभर पोटातील भूक मारून या गल्लीतून त्या गल्लीत, या फ्लॅट स्कीममधून त्या कॉलनीत त्यांची भटकंती सुरू असते. अरबाजला "शाळा शिकतोस काय?' असं विचारताच, "साबजी, पेट भरनाही तो है जिंदगी की पढाई... पेट की पढाई पास होना जरूरी है,' असे म्हणत अरबाज पुन्हा सुरीला धार लावण्यात मग्न होतो. 

शहरात शेकडो मुले

भोपाळ, मुलताई, बैतुल तसेच आजूबाजूच्या परिसरातून आलेली दोनशेवर मुले चाकू-सुऱ्यांना धार लावण्याच्या पारंपरिक व्यवसायाला जपत पोट भरण्याचे काम करतात. मिळेल त्या ठिकाणी राहातात. कुडकुडत्या थंडीतही शहरात गल्लोगल्ली फिरतात. महिनाभरात पाच ते सहा हजार मिळतात. खांद्यावर किंवा सायकलवर हे यंत्र घेऊन फिरतात. दिवसभर शहरात हिंडून रात्री एकत्रित आल्यावर रेल्वेस्टेशनसारख्या ठिकाणी मिळेल तिथे आपली रात्र काढतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 years child works for sharpening a knife